पेण तालुक्यातील आदिवासी आश्रम शाळेत चुकीची औषधं दिल्यानं विद्यार्थिनीचा मृत्यू! कारवाई शून्य, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

Varavane Ashram Shala

रायगड (अमुलकुमार जैन) : 
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेतील चौथी मध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. पूर्वी कोणताही आजार नसलेली खुशबू नामदेव ठाकरे या चौथी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला कुसुम योजनेत कुष्ठरोगी ठरविण्यात आले. त्याबाबत आरोग्य विभागाने त्या मुलीच्या पालकांना कळविले नाही तसेच आश्रमशाळेच्या माध्यमातून देखील मुलीच्या पालकांना कळविले नाही. दरम्यान, चुकीची औषधें घेतल्याने आपल्या मुलीच्या अंगावर फोड्या आल्या,तिचे हातपाय सुजले आणि अत्यवस्थ झाली असून तिच्या मृत्यूस शासकीय आदिवासी आश्रमशाळा तसेच आरोग्य विभाग दोषी असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
पेण तालुक्यातील वरवणे येथे असलेल्या शासकीय आश्रमशाळेमध्ये तेथील कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आय.पी.एच.एस.उपकेंद्र वाकरुळ यांनी शासनाच्या कुसुम योजना अंतर्गत १६ डिसेंबर २०२४ रोजी शिबीर घेतले. महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा अंतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम 16 डिसेंबर 2024 रोजी कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र कुसुम अभियान शासकीय माध्यमिक आश्रम शाळा मधील निवासी शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली. यावेळी इयत्ता चौथी मध्ये शिकत असलेली खुशबू नामदेव ठाकरे हि विद्यार्थिनीचे अंगावर तीन चट्टे असल्याने तिला कुष्ठरोगी असल्याचे निदान केले. त्याबाबतची माहिती देणारे पत्र आरोग्य विभागाकडून १६ डिसेंबर किंवा त्यानंतर शासकीय आश्रमशाळा यांना देण्यात आले नाही.
पेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत मध्ये असलेल्या तांबडी आदिवासी वाडी मधील रहिवाशी असलेली खुशबू ठाकरे या चौथी मधील विद्यार्थिनीला कुष्ठरोगी ठरवण्यात आले.त्याबाबत त्या मुलीच्या पालकांना कल्पना देणे आणि त्यांचा सल्ला घेणे आवश्यक असताना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय आश्रमशाळा यांच्याकडून कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कुष्ठरोगी ठरविण्यात आलेल्या खुशबू नामदेव ठाकरे या मुलीला कुष्ठरोग निर्मूलन बाबत गोळ्या १८ डिसेंबर पासून सुरु करण्यात आल्या.तपासणी शिबीर आणि गोळ्या सुरु झाल्यानंतर २८ डिसेंबर पर्यंत नामदेव ठाकरे यांना आपल्या मुलीला कुष्ठरोगी ठरविण्यात आले आहे. याबाबत कोणतीही माहिती नव्हती. खुशबू ठाकरे हिची मोठी बहीण याच शाळेत शिकत होती आणि ती सहली साठी जात असल्याने तिला भेटण्यासाठी नामदेव ठाकरे आश्रमशाळेत आल्यावर खुशबू आजारी असल्याचे कळले.
खुशबू ठाकरे हि चौथी मध्ये शिकत असलेल्या आपल्या मुलीला ताप येत असल्याने तिला नामदेव ठाकरे यांनी आपल्या घरी तांबडी येथे नेले. त्यावेळी घरी नेल्यावर शाळेतून देण्यात आलेल्या गोळ्या तिचे पालक देत होते. मात्र त्या कसल्या गोळ्या आहेत याची पुसटशी कल्पना नामदेव ठाकरे यांच्या कुटुंबाला नव्हती. तीन जानेवारी रोजी सदर पालकाने आपल्या मुलीला पुन्हा आश्रमशाळेत नेवून सोडले. मात्र कोणताही आजार नसलेल्या मुलीला कुष्ठरोगाच्या गोळ्या दिल्या जात असल्याने त्याचा साईड इफेक्ट खुशबू ठाकरे हिच्या शरीरावर दिसून येऊ लागला. तिच्या अंगावर फोड्या उठल्या तसेच हात पाय यांना सूज येऊ लागली. हि बाब १० जानेवारी नंतर खुशबूचे अंगावर दिसून येऊ लागल्यावर नामदेव ठाकरे यांना आश्रमशाळेत बोलावून घेण्यात आले.आणि त्यावेळी पालकांच्या सोबत खुशबू हिला पेण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले,त्यावेळी शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
तेथे खुशबू हिची प्रकृती गंभीर असल्याने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यास सांगितले.पनवेल येथे १६ जानेवारी रोजी नेण्यात आल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी कुष्ठरोगाच्या गोळ्या कोणी दिल्या आणि त्या तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या. तोपर्यंत शासकीय आश्रमशाळेतील महिला अधीक्षिका सुवर्णा वरगने यांच्या कडून दिल्या जात होत्या. मात्र त्यांनी आणि आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित पवार यांच्याकडून पालकांना तुमची मुलगी कुष्ठरोगी आहे याची कल्पना दिली नव्हती.१६ जानेवारी पासून पनवेल येथील एमजीएम रुग्णलयात उपचार घेत असलेली खुशबू हिचे २२ जानेवारी रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्प अधिकारी कार्यलयाने दुसऱ्याच दिवशी वरवणे येथील शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यपक आणि अधीक्षिका यांना करणे दाखवा नोटीस बजावली.परंतु त्या कारणे दाखवा नोटिसीला तीन दिवसात कोणतेही उत्तर देण्यात आले नव्हते. त्यानंतर प्रकल्प अधिकारी कार्यलयाने शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यातून प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे हे देखील एका निरपराध मुलीच्या मृत्यूचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.
————————————————
आमच्या मुलीला कोणताही आजार झालेला नव्हता तिच्या चेहऱ्यावर असलेले डाग हे जन्मापासूनच होते. कुष्ठरोगाचे नव्हते ते जन्मापासूनच होते. त्यामुळे शासनाच्या कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र कुसुम अभियानामुले एका निरपराध मुलीला कुष्ठरोगी ठरविण्यात आले आहे. त्यात आपली मुलगी कुष्ठरोगी आहे आमची मुलगी खुशबू हिच्या लिव्हर मध्ये आलेली सूज तसेच अंगावरती सूज हे लक्षण चुकीचे उपचारा मुळे आली होती. परंतु तुमच्या मुलीला कुष्ठरोगी ठरवण्यात आले आहे, हे मला मुख्याध्यापक किंवा अधीक्षिका यांनी सांगितले नाही. ते सांगण्याची तसदी शासकीय आश्रमशाळेच्या घेतली नाही आणि त्यामुळे माझ्या मुलीच्या मृत्यूस आशमशाला मुख्याध्यपक आणि अधीक्षिका यांना जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर शासनाने कारवाई करावी.
…नामदेव ठाकरे, मुलीचे वडील
————————————————

संपूर्ण महाराष्ट्रभर कुसुम ही कुष्ठरोगाच्या सहाराला रोखण्यासाठी राबवली जाणारी मोहीम असून या मोहिमेतून कुष्ठरोगाचे संशयित रुग्ण शोधून त्यांना उपचार उपलब्ध करून देणे हा उद्दिष्ट आहे. परंतु कुष्ठरोग नसलेल्यांना उपचार करून कुसुम अभियानाला गालगोट लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खुशबूचे मृत्यू कारणीभूत असलेल्या प्रत्येकाची शासनाने चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी.

…जैतू पारधी, आदिवासी कार्यकर्ते कर्जत
————————————————

आमच्या शाळॆत कुष्ठरोग निर्मलन बाबत शिबीर झाले आणि त्यात एका मुलाला कुष्ठरोगी ठरवले होते.प्राथमिक आरोग्य केंद्राकडून देण्यात आलेल्या गोळ्या आमच्या अधीक्षिका यांच्याकडून दररोज देण्यात येत होत्या. तसेच त्या मुलीला ताप आल्यावर आम्ही वाकरूळ येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य उप केंद्रात नेले.

अजित पवार, मुख्याध्यापक,शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वरवणे
————————————————
प्राथमिक आरोग्य केंद्राने खुशबू हिला गोळ्या देण्यास सांगितले त्याप्रमाणे मी दररोज दोन गोळ्या झोपण्याआधी देत होते. नंतर तिला ताप आल्यानंतर दोन गोळ्या देण्यास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी सांगितल्यावर एक गोळी देण्यास सुरुवात केली. तिचे पालक शाळॆत आले आणि घरी घेऊन गेले त्यावेळी त्यांना दररोज हि गोळी एक द्यायची आहे असे सांगितले.
…सुवर्णा वरगने, अधीक्षक शासकीय आश्रमशाळा वरवणे
————————————————

शासकीय आश्रमशाळा वरवणे येथील मुलीला कुष्ठरोग झाला असून तिला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केल्यावर मी स्वतः रुग्णालयात गेलो होतो. २२ जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाल्यावर शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे.

…आत्माराम धाबे — प्रकल्प अधिकारी पेण आदिवासी प्रकल्प
————————————————

शासनाच्या निर्देश नुसार आम्ही आश्रम शाळेत कॅम्प आयोजित केला होता. तेथे एक विद्यार्थिनीला कुष्ठरोग असल्याचे आढळून आले. त्या दिवशी आमच्या कडे गोळ्यांची पाकिटे नव्हती आणि त्यामुळे लगेच गोळ्या सुरू केल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी सदर मुलीचे नावाचे लेबल केल्यावर 18 डिसेंबर पासून उपचार सुरू केले.

…डॉक्टर नेत्रा पाटील, वैद्यकीय अधिकारी, कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading