PEN न्यूज ऑनलाइन टीम :
पेण येथील उद्योजक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी विवाहितेचा छळ करुन तिच्या डोक्यावर पिस्तूल ठेवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रज्ञा अमर पाटील या पीडितेने पेण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, संबंधित आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रज्ञा अमर पाटील यांनी २९ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नवऱ्याने तिच्यावर शारीरिक व मानसिक अत्याचार केले. “तुझ्या बापाला एकही पैसा परत देणार नाही” असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केली. माहेरून आणलेले दागिने गहाण ठेवून मिळवलेले पैसे व्याजाने देऊन व्यवसाय केला जात असून, पैसे न परत करणाऱ्यांना धमक्या, मारहाण आणि बंदिस्त केल्याचेही आरोप त्यांनी केले आहेत.
प्रज्ञा अमर पाटील म्हणल्या की माझे पती याचे अनेक महिलां बरोबर अनैतिक संबंध आहेत. या प्रकरणी पती याचे विरोधात पेण पोलीस स्टेशन मध्ये एका महिलेने भा.द.वि. कलम ३७६ प्रमाणे गुन्हा रजि. नं. १३५ / २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. नवरा हा रात्री अपरात्री दारु पिऊन येऊन करत असलेली मारहाण सासू, सासरे, दीर यांच्या कडून हुंड्या साठी होणारा छळ यामुळे नाईलाजाने मी ०२/०८/२०२४ रोजी पेण पोलीस स्टेशन मध्ये नवरा, सासू, सासरे यांच्या विरोधात गुन्हा रजि. नंबर २२६/२०२४ कलम ८५, ७५(१), ११५(२),३५२, ३५१(२), ३५१ (३)(५) अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे असेही त्यांनी संगितले.
२०१३ मध्ये अ** पा** यांच्याशी विवाह झाल्यानंतर काही वर्षांतच हुंड्यासाठी त्रास सुरू झाला. “तुझ्या बापाने पन्नास लाख रुपये आणि चारचाकी दिली नाही, म्हणून तुझे जीवन नकोसे करून टाकीन” अशा धमक्या देत सातत्याने छळ केला जात होता. प्रज्ञा पाटील यांना २०१५ मध्ये एक मुलगा झाला, परंतु त्यानंतरही त्रास वाढत गेला.
ऑक्टोबर २०२१ मध्ये पीडितेच्या वडिलांकडे ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. धमकी दिली की पैसे दिले नाहीत तर मुलीला ठार मारू. एप्रिल २०२२ मध्ये २३ लाख रुपये रोख व ३० तोळे सोने सासरच्या मंडळींना देण्यात आले. मात्र, त्यानंतरही छळ थांबला नाही.
२० मार्च २०२५ रोजी सासरे, पती आणि दीर यांनी राहत्या घरी येऊन प्रज्ञा यांना मारहाण केली. नवऱ्याने गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या मावस बहिणीने हस्तक्षेप करत त्यांना वाचवले. त्याचवेळी “पोलिसात तक्रार केलीस तर तुला आणि तुझ्या आई-वडिलांना गोळ्या घालून ठार करू” अशी धमकीही देण्यात आली., असेही त्या म्हणल्या.
२६ मार्च रोजी रात्री पुन्हा एकदा सासऱ्यांनी घरी येऊन प्रज्ञा अमर पाटील यांच्यावर खोटे आरोप करत “हे घर ताबडतोब खाली कर” अशी धमकी दिली. त्यानंतर नवऱ्याने पिस्तूल काढून डोक्यावर ठेवले आणि गोळ्या झाडण्याची धमकी देत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
या सर्व प्रकरणी २८ मार्च रोजी पेण पोलीस स्टेशनमध्ये पती, सासू-सासरे, पती, दीर आणि नणंद यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे.
प्रज्ञा अमर पाटील यांनी पोलीस प्रशासनाकडे न्यायाची मागणी करत सांगितले की, त्यांचा जीव धोक्यात आहे. राज्याचे गृहमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक व रायगड पोलीस अधीक्षक यांच्याकडेही त्यांनी तक्रार केली असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रज्ञा अमर पाटील यांनी केली आहे.
—————————————
तक्रारदार प्रज्ञा अमर पाटील यांनी जो तक्रारी अर्ज दाखल केला आहे, त्या अनुषंगाने या अगोदरच यातील तीचे सासरे सुरेश जोमा पाटील, पती अमर सुरेश पाटील, सासू लक्ष्मी सुरेश पाटील, दिर भरत सुरेश पाटील, नणंद हर्षदा राहुल पाटील यांच्यावर २ ऑगस्ट २०२४ रोजी गुन्हा दाखल होऊन त्याचे दोषारोप पत्र याच महिन्यात न्यायालयात दाखल केले आहे. मात्र आता २८ मार्च रोजी पुन्हा तक्ररदार प्रज्ञा पाटील यांच्याकडून आलेल्या तक्रारी अर्जानुसार पेण पोलिसांमार्फत १४ दिवसांच्या आत तपास करण्यात येईल. सदर तपासाअंती यातील पाचही जण दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
….संदीप बागुल, पोलीस निरीक्षक – पेण