शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी राज्यभरात दौऱ्याची मोहिम सुरु केली आहे. विभागीय शिबिरांच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा व्यापक कार्यक्रम ठाकरे गटाने आखला असून, याचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडला आहे. मुंबईमध्ये नुकतेच एक शिबिर पार पडले असून, आता याच मालिकेतील पुढचे शिबिर नाशिकमध्ये होणार आहे.
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी नाशिकमधील मनोहर गार्डन लॉन्स येथे हे विभागीय शिबिर भरवले जाणार आहे. हे शिबिर दिवसभर चालणार असून, यात प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, व स्थानिक नेतृत्व एकत्र येऊन संवाद साधतील, दिशा ठरवतील आणि आगामी रणनीतीवर चर्चा करतील.
या शिबिराचे खास आकर्षण म्हणजे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कधीही न ऐकलेली भाषणे या वेळी दाखवली जाणार आहेत. विशेष म्हणजे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ही भाषणे सादर केली जाणार असल्याने कार्यकर्त्यांना एकप्रकारे बाळासाहेबांच्या उपस्थितीची प्रचिती येणार आहे.
या शिबिरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: हजेरी लावणार असून, ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. त्यांच्या या भेटीमुळे नाशिकमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. बऱ्याच काळानंतर उद्धव ठाकरे नाशिकमध्ये येणार असल्याने, हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे, संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारची विभागीय शिबिरे घेण्याचा ठाकरे गटाचा मानस आहे. प्रत्येक शिबिरासाठी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण समर्पणाने तयारी करत असून, यामधून पक्षात नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
ही नवी दौरा मोहीम ठाकरे गटासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून, आगामी काळात घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर याचा ठळक परिणाम होऊ शकतो.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.