PEN न्यूज ऑनलाइन टीम :
पेण येथे आयोजित गणेश मूर्तिकारांच्या जाहीर सभेत पीओपी मूर्तींवरील बंदी हटवण्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्र गणेश मूर्तिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अभय म्हात्रे यांनी सरकारने न्यायालयात मूर्तिकारांच्या बाजूने भूमिका मांडावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कोट्यवधी कुटुंबांचे जीवन संकटात सापडले असल्याने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
या वेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी पीओपी मूर्तिकारांच्या समस्यांसंदर्भात सरकार न्यायालयात त्यांची बाजू योग्यरीत्या मांडेल, असा विश्वास दिला. आमदार रवीशेठ पाटील यांनी शासकीय पातळीवर सर्व वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून न्यायालयात पीओपी मूर्तिकारांना न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. खासदार धैर्यशील पाटील यांनीही संघटनेच्या पाठीशी राहून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. गरज पडल्यास आंदोलनात सहभागी होऊ, असेही त्यांनी सांगितले.
पेण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी न्यायालयीन लढाईशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट करत सर्व मूर्तिकारांनी संघटित राहण्याचे आवाहन केले. या लढाईत विजय निश्चित असून, मोठ्या कायदेतज्ज्ञांच्या मदतीने हा लढा लढला जाईल, असे त्यांनी सांगितले.
या सभेला खा. धैर्यशील पाटील, आ. रविंद्र पाटील, माजी आ. अनिकेत तटकरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, शिशीर धारकर, निलेश जाधव, महाराष्ट्र राज्य गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे, मुंबई गणेश मूर्तिकार समितीचे सचिव सुरेश शर्मा, प्रविण बावधनकर, हमरापूर विभाग श्री गणेश उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष जयेश पाटील, माजी अध्यक्ष कृणाल पाटील, खजिनदार कैलास पाटील, सचिव राजन पाटील, नितीन मोकळ आदींसह शेकडोच्या संख्येने राज्यातील गणेशमूर्तिकार उपस्थित होते.