यशवंतनगर पंचक्रोशीतील बहुतांशी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या विविध योजनांच्या विहिरींनी तळ गाठल्यामुळे दोन तीन दिवसांआड तास अर्धातास पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतींना भाग पडत आहे. तर काही ग्रामस्थांना बाटली बंद अथवा अन्य खाजगी फिल्टर केलेल्या पाण्यासह येथील खाजगी व पारंपरिक विहिरीतील पाणी अक्षरशः विकत घ्यावे लागत आहे.
येथील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून तीन विहिरी खोदण्यात आल्या आहेत.परंतू या सर्व विहिरीतील पाण्याच्या पातळीने मार्च महिन्यातच तळ गाठला त्यामुळे पाण्याची टंचाई भासू लागल्याने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासूनच येथे पाणी कपात करण्यात आली आहे.
सद्या तर दोन दिवसांनी अर्धा ते एक तासभर पाणी सोडले जात आहे.तसे तर गावच्या काही भागात विहुर पाझर तलावातील पाण्याचा पुरवठा केला जातो. या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी ग्रामपंचायतीने बसवलेल्या दोन फिल्टर व्दारे नांदगाव खालचा मोहल्ला व कोळीवाडा भागात धरणातील पाणी शुद्ध करुन नागरिकांना पुरवले जाते.परंतु विस लिटर पाण्यासाठी त्यांना दहा रुपये खर्च करावे लागतात.तशाच प्रकारचा एक फिल्टर नांदगाव भवानी पाखाडीत मंदिरानजिकच्या विहीरीवर आ.दळवी यांनी बसवला असून तेथे दहा रुपयांच्या मोबदल्यात पंधरा लिटर शुद्ध पाणी नांदगावकरांना मिळते.
विजेचा कमी दाब व खंडीत वीजेअभावी त्यास काहीवेळा खंड पडतो . तालुक्यातील मजगाव ग्रामपंचायतीतील नागरिकांना गावातील पारंपरिक विहिरीतील पाणी विस रुपये हंड्याने विकत घ्यावे लागत आहे. तर अन्य वापरासाठी शंभर ते दोनशे रुपये दराने पाचशे लिटर पाण्यासाठी मोजावे लागत आहेत.पंचक्रोशीतील अनेक नागरिक वर्षभर बाटली बंद अथवा अन्य फिल्टर केलेले पाणी विस लिटरला शंभर रुपये या दराने विकत घेऊन आपली तहान भागवीत आहेत. तर आदाड ,वाळवटी
उसरोली या गावातील स्थानिक पारंपरिक विहिरीतील पाण्याबरोबरच विकतचे पाणी घेत असल्याने पंचक्रोशीतील नागरिकांचा खर्च अन्य जिवनावश्यक वस्तूंबरोबरच आता पिण्याच्या पाण्यासाठी देखील होत आहे. सद्याच्या वाढलेल्या तापमानाबरोबर जसजसा पावसाळा लांबेल तसतसा त्यांचा हजारोंचा खर्च हा पिण्याच्या पाण्यावर होणार आहे.
दरम्यान केंद्राच्या व राज्याच्या जलजीवन मिशन व हर घर जल योजनांचे मोठ्या थाटात भूमीपूजनाचे सोहळे पार पडले आहेत. या योजनांच्या अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याची कामे अनेक ठेकेदारानी अर्धवट ठेवून योजनेअंतर्गत तिस टक्के रक्कम उचलल्याचे वृत्त आहे. ह्या योजनाही सद्या अस्तित्वात असलेल्या विहिरीतील पाण्यावरच अवलंबून असणार आहेत. केद्राच्या योजनेसाठी येथील खारआंबोली धरणातील पाण्याचा पुरवठा अनेक ग्रामपंचायतींना करण्यात येणार असल्याचे कळते.
सद्या या धरणातून पाण्याचा पुरवठा मुरुड शहरातील जनतेला केला जात आहे .याच धरणातील पाणी नजिकच्याच दिघी पोर्टलाही देण्यात येणार असून शिवाय धरणाच्या परिसरातील शेतीलाही पुरविण्यात येणार आहे. मात्र धरणातील एकूण पाणीसाठा व या सर्व योजनांचा मेळ घालण्यासाठी सर्वांनाच अक्षरशः तारेवरचीच कसरत करावी लागणार आहे.
एरव्ही उन्हाळ्यात पाणी आटणार्या विहिरींतील पाण्याचा पुरवठा हर घर कसा होणार हा खरा प्रश्न आहे. मुळात आडातच नसेल तर पोहर्यात कुठुनयेणार योजना अनेक आहेत पण पाणी साठाच जर उपलब्ध नसेल तर त्यांचा उपयोग तरी काय? येथील पंचक्रोशीला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करता येईल अशी नांदगाव ग्रामीण पाणीपुरवठा योजना रखडलेली , प्रस्तावित वांद्रे वेळास्ते धरणाला असलेला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध, विहुर पाझर तलाव व फणसाड धरणातील पाणीसाठ्याची क्षमता त्यांची एकूणच सुरक्षितता,त्यात साठलेला गाळ, शिवाय अन्य योजनांचा पत्ताच नाही.
वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण, पर्यटनाच्या धर्तीवर वाढणार्या पर्यटकांच्या संख्येला पुरविण्यासाठी लागणारे पाणी, बदलते हवामान, भूगर्भातील घटत जाणारी पाण्याची. पातळी लक्षात घेऊन भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मोठे पाऊल उचलावेच लागणार आहे.त्यासाठी नांदगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना नव्याने पुनर्जीवित केल्यास खर्चही कमी होईल व चाळीस वर्षांपूर्वी येथील जनतेने भरलेली लोकवर्गणीही कामी येईल.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.