
माथेरान ( मुकुंद रांजणे ) :
माथेरान बद्दल प्रचंड आत्मीयता आणि प्रेम असल्यामुळे याठिकाणी मोठया प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. परंतु इथे आल्यावर दस्तुरी वाहन पार्किंग मध्ये सुट्ट्यांच्या हंगामात वाहने पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध नसते. जागोजागी इमारतीचे सामान अस्तव्यस्त पडलेले असून कुठेतरी जंगलात किंमती वाहने पार्क करावी लागतात.
याच ठिकाणी एमपी ९३ हा प्लॉट असून याचा ताबा अद्यापही नगरपरिषदेला मिळालेला नाही त्यामुळेच पर्यटकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. आगामी दिवाळी पर्यटन हंगाम जवळ आला असून नेहमीप्रमाणे घाटात वाहतूक कोंडी होणार हे नवीन नाही.
या कोंडीतून मार्ग काढताना पर्यटकांना आपल्या लवाजम्यासह माथेरान गाठणे म्हणजे एक प्रकारे इथे येण्याची शिक्षाच असते. वनखात्याच्या अंतर्गत असणाऱ्या वन समितीच्या माध्यमातून वाहन कर आकारणी केली जाते.तर नगरपरिषदेकडून प्रवासी करासोबतच वाहन कर आकारणी सुध्दा केली जाते.
दोन्ही खात्यांकडून दुबार वाहन कर आकारणी घेऊन सुध्दा इथे सुरक्षित पार्किंग व्यवस्था उपलब्ध नाही. ही संपूर्ण जागा वनखात्याच्या अखत्यारीत येत असून वन समिती केवळ जागेचे भाडे आकारते परंतु वाहनांची कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेतली जात नाही त्यामुळे बेभरवशाचा खेळ करत पर्यटकांना आपली किंमती वाहने पार्क करून गावात यावे लागते. त्यामुळे जर का वाहनांची देखभाल घेतली जात नसेल तर पार्किंग आकारणी घेऊ नये असे पर्यटक बोलत आहेत.
——————————————————-
मी नगराध्यक्ष असताना २००७ साली सदर प्लाॅट नगपरिषदेकडे हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव केला. त्याला प्रतिसाद देत तत्कालीन जिल्हाधिकारी निपुण विनायक यांनी सदर भुखंड खाजगी ट्रस्टकडून सरकारजमा करुन घेतला. त्यानंतर हा ५.५ एकरचा भुखंड न.प. कडे हस्तांतरीत करण्याकरीता प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठविला. दुर्दैवाने मागील १५ वर्ष हा प्रस्ताव शासकीय पुर्ततांच्या लालफितीत अडकुन पडला होता. तीन आठवड्यांपुर्वी मा. आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी कोकण आयुक्तांची भेट घेऊन या प्रस्तावाला गती दिली आहे. मागील दिड वर्ष मी मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय, कोकण आयुक्त कार्यालय व नगरपरिषद यांचेबरोबर सातत्याने समन्वय साधत आहे. लवकरच मा. मुख्यमंत्री एमपी ९३ हा प्लाॅट नप कडे हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव मंजुर करतील.
…मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष माथेरान
——————————————————-
आगामी दिवाळी पर्यटन हंगामात हा विषय पुन्हा ऐरणीवर येणार आहे,व या तुटपुंज्या पार्किंग चा ,पर्यटनाचे नियोजन करून आलेल्या पर्यटकांना सामाना करावा लागणार आहे, त्याकरिता वनविभाग व नगरपरिषदेने समनव्यातुन आतापासूनच पनोरामा पॉईंट व माऊंट बेरी कडे जाणाऱ्या मार्गावर जास्तीची पार्किंग करणेसाठी व्यवस्था करणे गरजेचे आहे असे केल्यास निदान दिवाळी पर्यटन हंगामात तात्पुरता का होईना दिलासा मिळेल.
…योगेश जाधव, अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समिती माथेरान
——————————————————-
माथेरान हे जगप्रसिध्द हिल स्टेशन असताना पार्किंग या ९३ एमपी प्लॉट बाबत जवळपास 16 वर्षा पासून नगरपालिका मागणी करीत आहे. परंतु राज्यसरकार पर्यटन वाढविण्यासाठी नवं नवीन पॉलिसी आणते .परंतु माथेरानच्या पर्यटनासाठी आवश्यक प्लॉट राज्यसरकार कडून नगरपालिकेला मागील 16 वर्षांपासून हस्तांतरण होतं नाही ही बाब गतिमान व्यवस्थेसाठी खेदजनक बाब आहे.
….शिवाजी शिंदे, माजी विरोधी पक्षनेते माथेरान नगरपालिका