पाणीटंचाईची झळ कायम; नद्यांमध्ये पाण्याचा खडखडाट

Boring
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
तालुक्यामध्ये जलस्वराज, भारतनिर्माण आदी विविध नळपाणी योजनांनंतर ‘हर घर नल’ घोषणेसोबत जलजीवन मिशन नळपाणी योजना सुरू झाली. तालुक्यात सुमारे 53 कोटी खर्चाच्या या जलजीवन मिशनमधून पाणी टंचाई निवारण यंदा शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने ‘नेमेचि येतो मग टंचाई निवारण कृती आराखडा’ पंचायत समिती आणि तहसिलदार कार्यालयाच्या दुहेरी नियंत्रणाखाली दरवर्षीप्रमाणे आखण्यात आला असून या टंचाई आराखडयामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठयासह सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसा, विंधनविहिरींची दुरूस्ती करणे, विंधनविहिरी करणे आदी खर्चिक आणि तरीही बेभरवशाच्या कामांचा उल्लेख दिसून येत आहे. दरवर्षीच्या टंचाई निवारण आराखडयाचा आढावा घेण्यासाठी दरवर्षी होणारी आमसभा होत नसल्याने ‘बगलबच्चे तरीही लुच्चे’ असलेल्या राजकीय ठेकेदारांना जनतेला पाण्यासाठी दाहिदिशा फिरवताना कमावल्याचा असुरी आनंद मिळत आहे.
पोलादपूर तालुक्यातील सावित्री, ढवळी, कामथी, चोळई आणि घोडवनी या पाच प्रमुख नद्यांच्या पाण्यांचे डोह वगळता सर्व पात्रांमध्ये पाण्याचा खडखडाट दिसून येत आहे. या नदीपात्रांमध्ये पाणी अडविण्यासाठी रेती काढण्याचे अभियान व्यापक प्रमाणात सुरू असले तरी या अभियानानंतर पात्रामध्ये दरवर्षी पाण्याऐवजी रेतीचाच साठा होत असल्याने महसुली उपसा मोठया प्रमाणात होत असतो.
पोलादपूर तालुक्यातील नावाळे, खडपी, चोळई, वावे, घागरकोंड, फौजदारवाडी, बोरघर, चांदले, सडवली, चांदके, सडे, धारवली, बोरज, देवळे, माटवण, कोतवाल खुर्द, गांजवणे, चरई, करंजे, पार्ले, दिविल, आडावळे बुद्रुक, सवाद, मोरगिरी, वडघर, हळदुळे, देवपूर, खांडज, खोपड, लोहारे, कोंढवी, तुर्भे बुद्रुक, भोगाव बुद्रुक, निवे, ढवळे, केवनाळे, क्षेत्रपाळ, महाळुंगे, साळवीकोंड, कातळी, नाणेघोळ, कापडे बुद्रुक, रानवडी, गोवेले, ओंबळी, ताम्हाणे, कापडे खुर्द, महालगूर, परसुले, चिखली, गोलदरा, आडावळे, चांभारगणी बुद्रुक, फणसकोंड, कणगुले आदी 57 नळपाणी पुरवठा योजनांचे काम 22 ठेकेदारांमार्फत सुरू असून 53 कोटी रूपयांची तरतूद जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या एकाही योजनेमध्ये फिल्टरेशन प्लांटचा समावेश दिसून येत नाही.
जलजीवन मिशनच्या नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर या गावांमध्ये टंचाईनिवारण आराखडा लागू होणार अथवा नाही, याबाबत कोणतीही स्पष्टता नसलेल्या यंदाच्या 2023-2024 पाणी टंचाई निवारण कृती आराखडयामध्ये 1 कोटी 40 लाख खर्चाच्या 25 गांवे आणि 44 वाडयांमध्ये 69 सार्वजनिक विहिरीतील गाळ उपसा करण्याचे खर्चिक काम हाती घेण्यात आले आहे. यातील प्रत्येक कामांसाठी 2 लाख रूपयांचा खर्च निश्चित करण्यात आल्याचे आराखडयामध्ये नमूद करण्यात आले आहे. या कामांच्या यशस्वितेचा उल्लेख दिसून येत नसल्याने टंचाई निवारण होवो अथवा न होवो, निवारणाच्या प्रयत्नांचा खर्च मिळणार हे नक्की आहे.
बैलगाडीद्वारे अथवा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी 38 गांवे व 74 वाडया अशा एकूण 112 ठिकाणच्या 28 लाख रूपये खर्चाच्या उपायांचा या पाणीटंचाई निवारण कृती आराखडयामध्ये समावेश करण्यात आला. यामध्ये टँकरमुक्त करण्याचा प्रयत्नांना हरताळ फासण्यात आला असला तरी पूर्वीप्रमाणे टँकर्सची उपलब्धता होत नसताना परजिल्ह्यातील टँकर्स अधिग्रहित करून उपलब्ध केले जात असत. आता स्थानिक टँकर्सची उपलब्धता असल्याने 1 एप्रिलपासून कालवलीतील पवारवाडी, पाटीलवाडी, भोसलेवाडी, विठ्ठलवाडी, बौध्दवाडी, मोहल्ला या सहा वाडया, चांभारगणी, आड, किनेश्वरमधील किनेश्वरवाडी, किनेश्वर पेढेवाडी, किनेश्वर पेठवाडी या तीन वाडया, ताम्हाणे, निवे, वडघरमधील सणसपेढा, पाटीलवाडी, फौजदारवाडी, उलालकरवाडी, कामथे फौजदारवाडी, जांभाडी आणि बोरघर बौध्दवाडी, बाळमाची, मोरसडे येथील गवळयाचा कोंड, शिंदवाडी, भोसारवाडी या तीन वाडया, तुटवली गावासह गलतीचीवाडी, धनगरवाडी, परसुले धनगरवाडी, क्षेत्रपाळ गावासह आमलेवाडी, धनगरवाडी, कुडपण खुर्द गाव, कोतवाल गावासह कोतवाल सकपाळवाडी कोतवाल धनगरवाडी, आडावळे बुद्रुक एरंडवाडी, मोरसडे आडाचा कोंड, सडेकोंड, नावाळे गांव, कापडे खुर्द कोसंबवाडी, कुंभळवणे, कापडे खुर्द, कातळी बंगला गावासह कातळी बागवाडी, ओंबळी पेढा, तामसडे, मोरगिरी धनगरवाडी, कोतवाल खुर्द गावासह बेलाची वाडी, रेववाडी, बागवाडी, दाभाडधनगरवाडी आदी गांवांमध्ये टँकरद्वारे पाणीटंचाई निवारणाचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
पोलादपूर तालुक्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखडयातूनही पाण्याचा पैसा मिळविण्याची वृत्ती पंचायत समिती आणि तहसिल कार्यालय या दुहेरी एजन्सी मार्फत जोपासली जात असून गेल्या काही वर्षांपासून या पाणीटंचाईने तालुक्यातील राजकारणातील अर्थकारणही सांभाळल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading