पशू वैद्यकीय दवाखाना डॉक्टर विना पोरका; कायम स्वरूपी नियुक्तीची मागणी

Nagothane Davakhana
नागोठणे (महेंद्र माने) :
गवळ आळीमध्ये असलेला पशू वैद्यकीय दवाखाना गेली अनेक वर्षे डॉक्टर विना पोरका झाला असून या ठिकाणी कायम स्वरूपी डॉक्टर व कर्मचारी यांची नियुक्ती करण्याची मागणी नागोठणे विभागातील नागरिक करीत आहेत.
सदरील दवाखान्यात गेली अनेक वर्षे कोणताही डॉक्टर कायम स्वरूपी कार्यरत नाही. सदर दवाखान्यावर नागोठणे शहरासह विभागातील नागोठणे, कोंडगाव, पळस, कडसुरे, वणी, पिंगोडे, वरवठणे, वांगणी, पाटणसई व ऐनघर या ग्रामपंचायती मधील एकुण 32 खेडेगावे व आदिवासी वाड्या अवलंबून आहेत. या सर्व विभागात साधारण एकुण 10 ते 12 हजार पशुधन आहे.त्यामध्ये नागोठणे येथे साधारण 4000 ते 4500 पशुधन असल्याने याठिकाणी कायम स्वरूपी डॉक्टर व कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे.
सदरील दवाखान्यात एक डॉक्टर, वृणोपचारक व एक शिपाई असे तीन कर्मचारी ही पदे आहेत.परंतु प्रत्यक्षात कोणतेही डॉक्टर किंवा मदतनीस व एकही कर्मचारी उपलब्ध नाहीत. जे कोणी येतात त्यांची दोन तीन महिन्याने बदली होत असते. त्यामुळे दवाखाना सतत बंद असल्याचे दिसत आहे. तसेच कोणते डॉक्टर कोणत्या दिवशी उपलब्ध आहेत ? मदतनीस कोण आहेत ? त्यांचे नाव व मोबाइल नंबर त्यांची येण्या जाण्याची वेळ दवाखान्याच्या बाहेर कुठेही लिहिलेला दिसत नाहीत. त्यामुळे आपल्या प्राण्यांना घेऊन आलेल्या व्यक्तींना मनस्ताप सहन करावा लागतो.
यापूर्वी दवाखान्यात डॉक्टर नसल्याने गेली अनेक वर्षांचा पशू वैद्यकीय अनुभव असलेले तसेच दवाखान्यात एकमेव असलेले नामदेव जाधव नामक कर्मचारी शेतकर्‍यांच्या आग्रहा खातर डॉक्टरची भूमिका बजावत होते. व विभागातील जनावरांची सर्वोतोपरी काळजी घेत होते. परंतु सदरील जाधव यांची दोन तीन वर्षापूर्वी बदली झाल्याने दवाखान्यात दूसरा कोणीही कर्मचारी नसल्याने दवाखाना बंद ठेवावा लागत आहे.
या दवाखान्यात संबधित विभागाच्या अधिकार्‍यांनी जातीने लक्ष घालून लवकरात लवकर कायम स्वरूपी डॉक्टर व कर्मचार्‍यांची रिक्त पदे भरावीत तसेच नामदेव जाधव सारखा कर्मचारी सदरील दवाखान्यात कार्यरत व्हावा अशी मागणी विभागातील नागरिकांसह शेतकरी वर्ग करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading