
नागोठणे ( महेंद्र माने ) :
खड्डे युक्त मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सोमवार 02 सप्टेंबर रोजी एसटी बस खडयात आपटल्याने बसमध्ये प्रवास करणारे दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच विद्यार्थ्यांचे नातेवाईक व पालकांनी एसटी स्थानक व रुग्णालयात गर्दी केली होती.
पनवेलवरुन सुटलेली MH 14 AQ 3972 या क्रमांकाची व बाळू शिवाजी फड चालवीत असलेली पनवेल रोहा एसटी बस सोमवार 02 सप्टेंबर रोजी प्रवाशी घेऊन येत असता ; सदर बस दुपारी 12.15 वा.च्या सुमारास नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल कामथ येथे आली असता रस्त्यांवरील खड्यामध्ये जोरात आदळल्याने आमटेम ते नागोठणे असा प्रवास करीत बसच्या मागील सीटवर बसलेले आर्य नारायण मोकल व राज तुकाराम मोकल या दोन विद्यार्थ्यांच्या डोक्याला दुखापत होऊन जखमी झाले आहेत. त्यांना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करण्यात आले.
अधिक तपासणी व उपचारासाठी विद्यार्थ्यांना पेणकडे रवाना करण्यात आले. अपघात झाल्याचे समजताच काळजीत असलेले जखमी विद्यार्थ्यांचे नातेवाईक,पालक व नागरिकांनी नागोठणे एसटी स्थानक व रुग्णालयात गर्दी केली होती.