बुधवार दि.१९ मार्च २०२५ रोजी पद्मश्री पुरस्कार प्राप्त विशेष सरकारी वकील उज्वल निकम माणगांव कोर्टामध्ये खटल्या संदर्भात माणगांवला आले असता सामाजिक कार्यकर्ते कृष्णाजी महाडिक यांच्या विनंती वरून त्यांनी माणगांवच्या वनवासी आश्रमशाळेला भेट देण्याबाबत आश्वासन दिल्याप्रमाणे प्रत्यक्ष सदिच्छा भेट दिली आहे. या भेटी दरम्यान शाळेतील वेबसाईटचे उद्घाटन व मंदिराच्या पूजनाचे नियोजन शाळेने केले व ॲड.उज्वल निकम यांचे हस्ते ते पार पडले. या भेटी प्रसंगी त्यांनी मुलांचं व मुलींचे वसतिगृह, शाळेच सर्व विभाग खूप बारकाईने पाहीले. मुलींच्या वसतिगृहामध्ये उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम व श्री गणपतीच्या मंदिराचे त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजन देखील करण्यात आले.
महाराष्ट्रातील अनेक आश्रम शाळा मी बघितल्या पण त्या सर्व आश्रम शाळांमधील ही एक खूप छान व उत्कृष्ट आश्रम शाळा आज बघितली! असे उदगार विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी काढले आहेत. शाळेच्या आदर्श कामकाजा बद्दल व कातकरी समाजातील मुला-मुलीं साठी व्यावसायिक प्रशिक्षणाची उत्तम सोय केल्या बद्दल माणगांव डीवायएसपी सूर्यवंशी व तहसीलदार दशरथ काळे यांनी शाळेला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
ऍड.उज्वल निकम यांच्या हस्ते काल शाळेच्या डब्लु डब्लु डाॅट व्हीकेए माणगांव डाॅट काॅम (www.vkamangaon.com) या वेब-साईटचे उद्घाटन देखील करण्यात आले आहे. या वेबसाईट मध्ये आश्रम शाळेची इत्थंभूत माहिती आता सर्वजणांना पाहता येईल. सामाजिक कार्यकर्ते कृष्णाजी महाडिक यांच्या मदतीने मुंबईतील दानदाते गौरीशंकर चित्रमल मिठाईवाला यांनी मुलींच्या वसतिगृहासाठी प्रभू श्रीराम व गणपतीची सुंदर मूर्ती शाळेला भेट दिली आहे. ता मूर्ती खास मेरठ वरून त्यांनी मागविल्या आहेत अशी माहीती शालेय व्यवस्थापनाने दिली आहे. सर्व प्रकल्प बघून झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी आश्रम शाळेतच मुलांसोबत स्नेहभोजनाचा आनंद घेत शाळेला २५ वर्षे पूर्ण झाल्याने मान्यवरां कडून शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यास आल्या आहेत.
याप्रसंगी माणगांवचे तहसीलदार दशरथ काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात महादेव जाधव यांनी ऍड.उज्ज्वल निकम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शालेय समिती सहसचिव नितीन चांदोरकर, श्रीमती प्रतिभा ताई पोळेकर व जंगम गुरुजी शालेय समिती सदस्यांनी इतर मान्यवरांचे स्वागत केले. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक उत्तम पाटील व अरुण पाटील यांनी सर्व मान्यवरांना संपूर्ण शालेय प्रकल्प दाखविला आलेल्या विशेष अतिथींनी शालेय विद्यार्थ्यांशी गोड संवाद साधला.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.