मुंबईच्या विधानभवन परिसरात वृत्तांकन करत असताना सुरक्षारक्षकांकडून पत्रकारांना धक्काबुक्की व अरेरावी करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संलग्न पेणच्या वतीने शुक्रवार, दि. 20 रोजी पेण उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेश कांबळे, उपाध्यक्ष विनायक पाटील, सचिव स्वप्निल पाटील, खजिनदार किरण बांधणकर, सल्लागार दीपक लोके, सहसल्लागार गणेश पाटील, सदस्य रुपेश गोडिवले, प्रशांत पोतदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकारांना वृत्तांकन करताना होणाऱ्या अडथळ्यांविरुद्ध आणि सुरक्षारक्षकांकडून झालेल्या धक्काबुक्कीविरुद्ध संघटनेने जोरदार निषेध नोंदवला. तसेच, पत्रकारांवर हात उचलणाऱ्या सुरक्षारक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी विशेष मोहीम
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर वारंवार असे हल्ले होणे गंभीर बाब आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने याविरोधात भूमिका घेत, भविष्यात महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी पत्रकारांवर अनुचित प्रकार घडल्यास पत्रकार संघ ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे स्पष्ट केले. विशेषतः रायगड जिल्ह्यात पत्रकारांवर कोणताही अन्याय होऊ नये म्हणून कोकण कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर, जिल्हाध्यक्ष राकेश खराडे आणि तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांनी जिल्ह्यात विशेष मोहीम सुरू केली आहे.
पत्रकार संघाचा इशारा : अन्याय सहन केला जाणार नाही
पत्रकार हे समाजाच्या हितासाठी काम करणारे घटक आहेत, त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांना व अरेरावीला राज्यभर निषेध मिळत आहे. जर भविष्यात असे प्रकार पुन्हा घडले, तर संपूर्ण पत्रकार संघटना आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.