उरण ( विठ्ठल ममताबादे ) :
उरण तालुक्यातील नवीमुंबई पोलिस आयुक्तालय यांतर्गत असलेल्या न्हावाशेवा पोलिस ठाण्यात गोपनीय शाखेत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत रावण माने(५४) यांचे नुकतीच नवीमुंबई येथील अपोलो रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबातील कर्ता असलेल्या चंद्रकांत माने यांची पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी,जावई असा त्यांचा परिवार आहे.यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांवर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.
नोकरी निमित्त उरण शहरात रहिवासी झालेले चंद्रकांत माने यांच्या निधनाची बातमी कानी पडताच उरण तालुक्यातील अनेकांनी शोक व्यक्त केला. त्यांनी नवीमुंबई पोलिस दलात उरण,तुर्भे,नेरुळ, नवीमुंबई विशेष शाखा व शेवटी न्हावाशेवा पोलिस ठाण्यात गोपनीय शाखेत कार्यरत होते.त्यांनी पोलिस दलातील कार्यकाळात विविध क्षेत्रातील व्यक्तींसह सामान्य नागरिकांशी गोड स्वभावामुळे माणुसकीचे ऋणानुबंध निर्माण केले होते.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच न्हावाशेवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी रुग्णालयात धाव घेऊन परिस्थितीची पाहणी करून त्यांचा मृतदेह तात्काळ वाशी येथील महापालिका रुग्णालयात शव विच्छेदन करून सकाळी १०: ०० वाजता त्यांचा पार्थिव रुग्णवाहिकेतून न्हावाशेवा पोलिसांच्या ताफ्यासह त्यांचे नातेवाईकांना त्यांचे मूळ गाव असलेल्या धुत्ता,उस्मानाबाद – धाराशिव येथे रवाना करण्यात आले आहे. तेथील स्मशानभूमीत माने यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.