नोकरीच्या बहाण्याने बांग्लादेशातून नवी मुंबईत आणलेल्या महिलेला 2 लाखात विकले

Bagaladeshi Pidit Mahila

पनवेल :

बांग्लादेशातील जोडप्याने नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने 24 वर्षीय महिलेला बांग्लादेशातून अवैध मार्गाने नवी मुंबईत आणून तिला वेश्याव्यवसायात गुंतवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एका स्वंयसेवी संस्थेच्या मदतीने यातील पिडीत महिलेची सुटका केली आहे. तसेच सदर महिलेला वेश्याव्यवसायास लावणार्‍या बांग्लादेशी जोडप्याला पिटा कायदा त्याचप्रमाणे भारतीय पासपोर्ट अधिनियम आणि विदेशी नागरिक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तुलीप उर्फ अमीर आझम (27) आणि शैफाली जहांगीर मुल्ला (34) या दोघांचा समावेश असून सदर दोघे तसेच 24 वर्षीय पिडीत महिला असे सर्व बांग्लादेशी आहेत. जुलै महिन्यामध्ये आरोपी तुलीप याने पिडीत महिलेला मुंबईत हॉस्पिटलमध्ये काम मिळवून देण्याच्या बहाण्याने बांगलादेशातून अवैध मार्गाने भारतात आणले होते. त्यानंतर तुलीप आणि शैफाली या दोघांनी पिडीतेला नेरुळ मधील सारसोळे गावातील घरामध्ये आणून ठेवले होते. यादरम्यान तुलीप याने सदर महिलेसोबत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.
त्यानंतर तुलीप आणि शैफाली या दोघांनी तिला वेश्याव्यवसायासाठी ग्रॅन्ट रोड येथील कुंठणखान्यातील विकास नावाच्या मॅनेजरच्या ताब्यात दिले. त्यानंतर मॅनेजर विकास, संजय आणि मनोज या तिघांनी पिडीत महिलेला लॉजमध्ये ठेवून तिला वेगवेगळ्या ग्राहकांसोबत वेश्यागमन करण्यास भाग पाडले. त्यानंतर महिला आरोपी शैफाली हिने पिडीत महिलेला ग्रँट रोड येथील कृष्णा लॉजमधून पुन्हा आपल्यासोबत घेऊन तिला 2 लाख रुपयांमध्ये 2 व्यक्तींना विकून टाकले.
सदर दोन व्यक्तींनी देखील तिला वेगवेगळ्या ग्राहकांसोबत वेश्यागमन करण्यास भाग पाडले. त्यावेळी पिडीत महिलेने वेश्यागमन करण्यास विरोध केला असता, सदर दोन व्यक्तींनी तिला मारहाण देखील केली. यादरम्यान पिडीत महिलेने वेश्यागमनासाठी आलेल्या एका ग्राहकाच्या सहकार्याने कुंटणखान्यातून पळ काढून एका स्वंयसेवी संस्थेच्या मदतीने नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गाठले.
 सदर महिलेने तिच्यासोबत घडलेल्या सर्व काराची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक फृथ्वीराज घोरपडे आणि त्यांच्या पथकाने पिडीत महिलेला वेश्याव्यवसायात ढकलणार्‍या आरोपी तुलीप आणि शैफाली यांना तिच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांना बेलापूरमध्ये बोलावून घेतले. त्यानुसार सदर दोघेही बेलापूरमध्ये आले असताना, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या दोघांना ताब्यात घेतले.
या प्रकरणात पिडीत महिलेला बांग्लादेशातून भारतात आणून तिला वेश्याव्यवसायात ढकलणार्‍या तुलीप आणि शैफाली तसेच ग्रँट रोडच्या वुंटणखान्यातील 3 मॅनेजर तसेच पिडीतेला वेश्याव्यवसायासाठी 2 लाखांमध्ये विकत घेणार्‍या 2 अज्ञात व्यक्ती अशा एकूण 7 जणांचा समावेश असल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या सर्वांविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात बलात्कार, पिटा, अपहरण तसेच भारतीय पासपोर्ट अधिनियम-विदेशी नागरिक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन तुलीप आणि शैफाली या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी आता इतर आरोपींचा शोध सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading