काही महिन्यांपूर्वी वीज नसल्याने मेणबत्तीच्या उजेडात प्रसूती करावी लागल्याची घटना नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली होती. तर आता याच प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणीबाणी निर्माण झाली आहे. आरोग्य केंद्रात पाणी नसल्याने याचा फटका रुग्णांसह डॉक्टरांना देखील बसत आहे. तर पाण्याला दाब नसल्याने ते पाणी टाकीत जात नाही अखेरीस टाकीत पाण्याचा खडखडाट असल्याने शौचालय व बाथरुममध्ये पाण्याचा थेंब नसल्याची तक्रार रुग्णांकडून केली जात आहे.
कर्जत नंतर नेरळ हे दुसरे मोठे शहर आहे. नेरळ परिसरात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकिकरण झाले आहे. त्यामुळे येथील लोकसंख्या वाढली. तर शहरात शासकीय आरोग्य सेवा देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे एकमेव नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. नेरळ शहरासह बाजूला असलेल्या कोल्हारे, ममदापूर, शेलू, माणगाव, आदी ग्रामपंचायती मधील नागरिकांसाठी देखील हेच आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्रावर मोठा भार आहे.
महिन्याला सुमारे १०० गरोदर मातांची प्रसूती तर दिवसाला १५० रुग्णांची तपासणी येथे केली जाते. यासह रेल्वे स्थानकाला लागून असल्याने रेल्वे मार्गात होणारे अपघात, परिसरात होणारे अपघात त्यातील रुग्ण येथेच आणले जातात. तसेच शवविच्छेदन देखील केले जाते. वास्तविक कर्मचारी संख्या आदींची येथे वणवा असताना देखील सध्या कार्यरत डॉक्टर आणि कर्मचारी आपले कर्तव्य चोख बजावत असल्याचे चित्र आहे.
अशात या आरोग्य केंद्रासाठी नेरळ ग्रामपंचायतीची पाईप लाईन आहे. मात्र सध्या नेरळ ग्रामपंचायत शहरात पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी अक्षम ठरत आहे. त्यामुळे शहरात नागरिकांकडून पाण्यासाठी टाहो फोडला जात आहे. तर आरोग्य केंद्रात असलेल्या जुन्या हातपंपावरून पाणी घेण्याचा प्रयत्न केला असता तोही फोल ठरला आहे. नेरळ ग्रामपंचायतीच्या पाईप लाईनवरून येणारे पाणी कमी दाबाने येत असल्याने ते आरोग्य केंद्रात उंचीवर असलेल्या टाक्यांमध्ये जात नाही. त्यामुळे आरोग्य केंद्रातील पाण्याच्या टाक्यांमध्ये खडखडाट आहे.
येथील कर्मचारी रुग्णांना पिण्यासाठी पाणी मिळावं म्हणून खिशाला चाट पाडून विकतच पाणी आणत आहेत. तरी रोजच्या वापरासाठी पाणी मिळत नसल्याने या पाणी टंचाईचा फटका येथील निवासी डॉक्टरांसह रुग्णांना देखील बसत आहे. शनिवारी येथे आसल व जुमापट्टी येथील आदिवासी वाडीतील महिला रुग्ण दाखल झाल्या होत्या. तेव्हा शौचालय व बाथरूम मध्ये पाणी नसल्याची बाब आदिवासी कार्यकर्त्यांनी मांडली.
मात्र आरोग्य केंद्र प्रशासन त्यापुढे हतबल झाले असल्याचे चित्र होते. तेव्हा मोठी रुग्ण संख्या असलेल्या आरोग्य केंद्रात जर वापरण्यासाठी पाणी नसेल तर रुग्णाने कुठे जावे असा प्रश्न आदिवासी संघटनेने उपस्थित करत पाण्याची सोय जिल्हा परिषदेने करावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान नागरिकांच्या सोयीसाठी शासनाकडून नवनवीन आपले दवाखाने उघडले जात आहेत. सोयी सुवीधांची खैरात कागदावर वाटली जात असल्याचे चित्र आहे. मात्र प्रत्यक्षात साध्या साध्या गरजांसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असल्याचे भयावह चित्र आहे. तेव्हा ही कागदावरची सुविधा प्रत्यक्षात कधी येणार असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
———————————————–
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या आहे. आजूबाजूच्या आमच्या अनेक आदिवासी वाड्या वस्त्यांना हे आरोग्य केंद्र वरदान ठरले आहे. मात्र येथे सुविधांची कायम वणवा आहे. अनेकदा येथून रुग्णांना पुढे पाठवले जाते. शनिवारी आमच्या येथील आसलवाडी व जुमापट्टी येथील प्रसूतीसाठी दाखल महिलांना बघायला आम्ही आरोग्य केंद्रात गेलो तेव्हा तेथे शौचालय व बाथरुममध्ये पाणी नसल्याची बाब आम्हाला समजली. छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागत असेल तर शासन नक्की कुणासाठी राबतय हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. येथील पाण्याचा प्रश्न लवकर निकाली काढावा अन्यथा आम्हाला त्यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल.
…जैतु पारधी, सामाजिक आदिवासी कार्यकर्ते
———————————————–
नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या पाण्याच्या लाईनला पुरेसा दाब नसल्याने पाणी टाकीत चढत नाही. त्यामुळे पाणी टंचाई उद्भवली आहे. तर आम्ही पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नेरळ कोल्हारे दोन्ही ग्रामपंचायतीला भेट देऊन तोडगा काढण्याची विनंती केली आहे. यासह येथील जुन्या हातपंपावरून पाणी घेण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याची पातळी लवकर आटत असल्याने ते पाणी काही पुरत नाही. लवकरच या प्रश्र्नी तोडगा काढला जाईल.
…डॉ.नितीन गुरव, तालुका आरोग्य अधिकारी
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.