नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासक ॲक्शन मोडवर

नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासक ॲक्शनमोडमध्ये
कर्जत ( गणेश पवार ) : 
सदस्यांच्या राजीनाम्यानंतर विभागीय आयुक्तांनी नेरळ ग्रामपंचायत विसर्जित केल्यानं या ग्रामपंचायतीवर नुकतीच प्रशासकाची नियुक्ती होऊन ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी प्रशासकावर आली आहे. अशात डेंग्यूने थैमान घातलेल्या नेरळ शहरात सध्या ग्रामस्थांना स्वच्छता, आरोग्य सुविधा पुरवण्यावर प्रशासक सुजित धनगर यांनी भर दिला आहे. यासाठी सकाळी ६ वाजता नेरळमध्ये पोहचून धनगर यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेत त्यांना सूचना दिल्या आहेत. तर नेरळकरांना शुद्ध व पुरेसे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे देखील धनगर यांनी सांगितले आहे. दरम्यान नेरळ ग्रामपंचायतीचे नवे प्रशासन सुजित धनगर यांच्या कामाच्या झपाट्याने सर्वच अवाक झाले आहेत.
रायगड जिल्ह्यात १ नंबरची ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. जिल्ह्यामध्ये आर्थिक व लोकसंख्येच्या दृष्टीने नेरळ ग्रामपंचायतीचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक होता. लोकसंख्या वाढत राहिली पण नेरळ ग्रामपंचायतीचे उत्पन्न काही केल्या वाढले नाही. आजही घरपट्टी आणि पाणीपट्टी यावरच नेरळ ग्रामपंचायत अवलंबून आहे. तर दुसरीकडे सदस्य सरपंच यांच्यात मतभेद वाढून सरसकट सर्व सदस्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे सदस्यांच्या राजीनाम्यानंतर कोकण विभागीय आयुक्तांनी नेरळ ग्रामपंचायत विसर्जीत केली. यानंतर प्रशासनाने याठिकाणी कारभार सांभाळण्यासाठी प्रशासकाची नेमणूक केली. जिल्हा परिषदेमध्ये लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता असलेले सुजित धनगर यांना प्रशासक हि जबाबदारी देण्यात आली. धनगर हे कर्जत तालुक्यात राहणारे असल्याने या मातीशी आणि माणसांशी त्यांची नाळ जोडलेली आहे. त्यामुळे माझ्या कार्यकाळात जे होईल ते जनतेच्या हिताचं असलं पाहिजे हा दृष्टिकोन ठेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली आहे.
दिनांक २३ ऑक्टोबर रोजी कर्जतमध्ये राहणाऱ्या धनगर यांनी सकाळी ६ वाजताच नेरळ गाठत सकाळी स्वच्छता करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची भेट घेतली. शहरात सध्या डेंग्यू सदृश्य परिस्थिती असल्याने स्वच्छतेत कुचराई नको अशा सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. नेरळ शहरातील सर्व प्रभाग सकाळी फिरून तेथील कर्मचारी हे आपले काम चोख पार पडत आहेत याची खात्री करून घेतली. यासह सकाळी आलेल्या काही नागरिकांकडून तेथील समस्या देखील जाणून घेतल्या. 
सकाळी नेरळ शहरात पाणी सोडण्यास सुरुवात केली जाते. तेव्हा थेट बोर्ले येथील जल शुद्धीकरण प्रकल्पावर भेट देत तेथील अडचणी जाणून घेत नेरळ शहराला शुद्ध व पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती धनगर यांनी दिली आहे. तर पाणी विभागाचे कर्मचारी, तालुक्यातील तज्ज्ञ अधिकारी, यासगळ्याची एक बैठक घेऊन यावर काय उपाययोजना करता येतील यासाठी महत्वाची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती देखील धनगर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान नेरळ ग्रामपंचायतीची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी प्रशासक सुजित धनगर हे प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे. तर आजवर भल्या सकाळी शहरातील स्वच्छतेचा आढावा घेणारे धनगर पहिले अधिकारी आहेत. त्यांना या झपाट्याने काम करताना पाहून नेरळकरांच्या अपेक्षा वाढीस लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading