कर्जत ( गणेश पवार )
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील पियूष अपार्टमेंटमध्ये १४ नोव्हेंबर रोजी चोरीची घटना घडली. शिक्षक संतोष हिम्मतराव कोळी यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडून चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. नेरळ पोलीसांनी या प्रकरणात आरोपीचा वेध घेऊन अवघ्या काही दिवसांत चोरीcची उकल केली आहे.
प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने जवळपास ५० सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक माहितीच्या आधारे भिवंडी येथील आरोपी शफिक उर्फ टोपी अब्दुल शेख (वय ४६) याला अटक केली. त्याने चोरी केलेले दागिने डोंबिवलीतील रमेश गोपाल सोनी (वय ३६) याला विकले असल्याचे समोर आले. पोलीसांनी रमेश गोपाल सोनी यालाही ताब्यात घेतले आहे.
या तपासादरम्यान, नेरळ पोलीसांनी चोरीतील १.२९ लाख रुपयांचे, २६.२०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. आरोपी शफिक शेख याच्यावर यापूर्वी १८ घरफोडीचे गुन्हे दाखल असून, रमेश गोपाल सोनी याच्यावर चोरीचे मालमत्ता खरेदीचे ६ गुन्हे नोंद आहेत. नेरळ पोलीसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे आरोपी व खरेदीदार यांची मुसक्या आवळण्यात यश आले आहे.