महाड विधानसभा मतदार संघाच्या आमदारकीबाबतची अटकळ दूर करीत भरतशेठ गोगावले यांनी चौकार मारीत मंत्रीपदही पटकाविले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे सहकारी चंद्रकांत कळंबे हेदेखील आगामी रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये चौकार मारणार काय, याकडे पोलादपूर तालुकावासियांचे लक्ष लागले आहे. कळंबे यांच्या चौकारासोबतच त्यांनादेखील उपमंत्री पदाचा दर्जा असलेले रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळणार काय, याबाबतही तालुक्यात कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.
पोलादपूर तालुक्यातील गेल्या तीन टर्ममधील रायगड जिल्हा परिषदेचे दोन गट आणि पोलादपूर पंचायत समितीच्या चार गणांतर्गत निकाल सातत्याने स्थित्यंतराचे प्रतिक दर्शवित असताना तीनही टर्ममध्ये चंद्रकांत कळंबे यांचा विजय हॅटट्रिक साधणारा होता. शिवसेनेकडून जिल्हा परिषदेवर देवळे गटातून चंद्रकांत कळंबे पहिल्यावेळी निवडून आले त्यावेळी कोंढवी गटातून जिल्हा परिषदेवर मुरलीधर दरेकर निवडून आले होते. दुसऱ्या टर्ममध्ये शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे यांना पुन्हा देवळे गटातून विजयी होता आले तर कोंढवी गटातून काँग्रेसच्या अपर्णा जाधव यांना संधी मिळाली होती. दुसऱ्या टर्ममध्ये चंद्रकांत कळंबे यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद मिळाले होते.
देवळे जि.प. 58 गट नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला उमेदवारांसाठी राखीव असताना येथे कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर शेकापक्षाच्या उमेदवार सुमन काशिनाथ कुंभार यांनी 6118 मते मिळवित विजयश्री संपादन केली. लोहारे 59 जि.प.गटात सर्वसाधारण उमेदवारांचे आरक्षण असताना शिवसेनेचे माजी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत विष्णू कळंबे यांनी 5679 मते मिळवित हॅटट्रिक साधली. 4599 मते मिळविणाऱ्या काँग्रेस-शेकापक्ष उमेदवाराला कळंबेंनी 1080 मतांनी पराभूत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुभाष जाधव यांनी 1102 मते मिळविल्याने कळंबे यांच्या विजयाचे सूत्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांचे विभाजन हेच ठरले.
पोलादपूर नगरपंचायत झाल्यानंतर चंद्रकांत कळंबे यांना रायगड जिल्हा परिषदेच्या लोहारे जि.प.गटातून निवडणूक लढावी लागली. तेव्हा त्यांच्यासोबत नेहमीचे देवळे गटातील मतदार अथवा कार्यकर्तेही नसताना केवळ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुहीचा लाभ कळंबे यांना उठविता आल्याचे दिसून येत होते. पोलादपूर पंचायत समितीच्या कोंढवी पं.स. 118 गण सर्वसाधारण महिला राखीव असताना लोहारे जि.प.गटात शिवसेनेला एक मत आणि कोंढवी पं.स.गणात काँग्रेसला एक मत असे क्रॉस व्होटींग झाल्याने येथे काँग्रेस शेकापक्षाच्या दिपिका महेश दरेकर या 2633 मते मिळवून विजयी झाल्या. येथे शिवसेनेच्या सायली सतीश शिंदे यांना या क्रॉस व्होटींगचा फटका बसून त्यांना 2499 मते मिळून पराभूत व्हावे लागले. लोहारे जि.प.गटांतर्गत लोहारे 117 पं.स. गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी आरक्षित असताना शिवसेनेचे यशवंत भिकू कासार 3058 मते मिळवून विजयी झाले. कासार यांनी 1678 मते मिळविणाऱ्या काँग्रेसचे संजय जंगम यांना 1380 मतांनी पराभूत केले. रायगड जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला लोहारे पं.स.गणातील शिवसेना उमेदवाराच्या मतदारांनी तारल्याचे या निवडणुकीमध्ये दिसून आले.
मात्र, या तिसऱ्या टर्मची मुदत संपल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण न्यायालयात प्रलंबित असल्याने रायगड जिल्हा परिषदेची आणि पोलादपूर पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली नसल्याने चौथ्या टर्ममध्ये चंद्रकांत कळंबे यांना उमेदवारी मिळणार काय, असा प्रश्नच उदभवत नसून कळंबे यांनी 50 व्या वर्षानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केल्यानुसार ते अन्य कोणती निवडणूक लढतील, अथवा कसे, याबाबत खुलासा होत नाही.
महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील बेबनाव पाहता सेनेकडून ज्या उमेदवारांना संधी डावलली जाईल त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातून संधी मिळण्याची शक्यता दिसून येत आहे. तरीही शिवसेना सोडण्याचे धाडस उमेदवारी न मिळालेले नवखे तरूण उमेदवार करणार नाहीत तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अस्तित्व महाड विधानसभा मतदार संघातील उमेदवार स्नेहल जगताप यांच्या पक्षांतराच्या चर्चेमुळे कितपत प्रभावी असेल, याबाबत साशंकता असल्याने महायुतीतील तीनही पक्ष आपसात लढतील, असे चित्र दिसून येत आहे. यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे अस्तित्व निवडणुकीत उमेदवार उभे करण्याइतपत दिसून येण्याची शक्यता कमी होणार आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा हा पक्ष रायगड जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी सक्षम राहण्याची शक्यता नसल्याने महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षांचे उमेदवार एकमेकांना आव्हान देतील. मात्र, महायुतीतील शिवसेना पक्षाचे उमेदवार चौथ्या वेळीदेखील चंद्रकांत कळंबे असल्यास आ.भरतशेठ गोगावले यांच्याप्रमाणे कळंबेदेखील चौकार मारतील, यात शंका नाही. या चौकारासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या उपमंत्री दर्जाचे अध्यक्षपद कळंबे यांना मिळण्याकामी जो नेता सहकार्य करेल. त्या नेत्यामुळे भविष्यात पोलादपूरच्या नेतृत्वाला विधानसभा सक्षमपणे उमेदवारीची संधी मिळणे शक्य होणार आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.