उरण आमसभा गाजली; नागरिकांच्या समस्या सुटणार की तशाच राहणार ..?

Uran Amsabha
उरण (विठ्ठल ममताबादे ) :
नागरिकांच्या विविध समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी दरवर्षी आमसभेचे आयोजन केले जाते. मात्र उरण तालुक्यात २०१८ नंतर एकदाही आमसभा घेण्यात आली नाही. मात्र जनतेने आमसभा घेण्याची वारंवार मागणी केली होती. पत्रकारांनीही वेळोवेळी याबाबत आवाज उठविला होता. शेवटी नागरिकांचे वेगवेगळे प्रलंबित प्रश्न, विविध प्रकल्प, विविध कामांना होणारा उशिर, विविध प्रकल्प राबविण्यात येणारे अडथळे, शासकीय सेवा योजना राबविताना येणाऱ्या अडचणी आदी समस्या लक्षात घेता जनतेच्या मनाचा कौल घेत उरण पंचायत समिती तर्फे २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल , टावूनशिप, उरण येथे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार महेश बालदी, तहसीलदार उद्धव कदम, गटविकास अधिकारी समीर वठारकर, उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव, सहाय्यक पोलीस उपायुक्त न्हावा शेवा बंदर डॉ. विशाल नेहूल, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, गट शिक्षणाधिकारी प्रियांका म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख नरेश पवार, वाहतूक विभागाचे प्रमुख अतुल दहिफळे यांच्यासह विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी, प्रमुख यावेळी उपस्थित होते.
२०१८ नंतर पहिल्यांदाच उरणमध्ये आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी प्रशासकीय अधिकारी व आमदार महेश बालदी यांचे आभार मानले. सर्वांच्या उपस्थितीत विविध समस्ये वर उपाययोजनेला सुरवात झाली. संजय ठाकूर (खोपटे) यांनी उरण आगार मधील स्वछता बाबत प्रश्न विचारला तसेच खोपटे येथे होणारा अपुरा पाणीपुरवठा, खार बांधिस्ती, रस्त्यावर पडलेले खड्डे, रस्त्याचे निकृष्ट बांधकाम याविषयी आवाज उठविला. सत्यवान भगत (खोपटे )यांनीही पाणी पुरवठा, जलजीवन मिशन, अपुरी कामे, भ्रष्टाचार या बाबत आवाज उठविला. सर्व कंपनी व गोदामे यांचे कडील सीआरएस फंड व जेएनपीटी चा सीआरएस फंड तयार करून अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीला नुकसान भरपाई द्यावी. त्यासाठी आवश्यक तो निधी उभारावा अशी मागणी सत्यवान भगत यांनी केली.
सुमित पाटील (पागोटे)) यांनी पागोटे नवघर येथे महामंडळची बस सेवा उपलब्ध नाही. विद्यार्थीचे अनेक हाल होतात त्यामुळे कॉलेजला येण्या जाण्यासाठी व इतर नागरिकांना प्रवास करता यासाठी पागोटे येथे नवघर मार्गे बस सेवा सुरु करावी अशी मागणी केली.कृष्णा पाटील(पिरकोन )यांनी उरण कर्नाळा मार्गे पनवेल अशी बस सेवा सुरु करण्याची मागणी केली. तसेच पिरकोन गावात अनेक कंपन्या आहेत मात्र त्या ग्रामपंचायतला टॅक्स (कर ) देत नाहीत याकडे सर्वांचे लक्ष वेधले, उरण मध्ये होणारे अवैध पार्किंग वरही कृष्णा पाटील यांनी आवाज उठविला. माजी उपसभापती वैशाली पाटील यांनी बेशिस्त अधिकारी व भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
मुकुंद गावंड (पिरकोन )यांनीही पिरकोन ते आवरे दरम्यान रस्त्यावर असलेले पोल हटविणे तसेच विविध विषयावर आवाज उठविला. रमाकांत पाटील यांनी उरण तालुक्यातील अतिक्रमण कडे लक्ष वेधून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना अतिक्रमण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी वाढते अपघातांचे प्रमाण व मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुख्य रस्त्यावर सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, स्ट्रीट लाईट लावण्यात यावे अशी मागणी केली.जासई ग्रामपंचायतचे उपसरपंच आदित्य घरत यांनी गव्हाण फाटा ते दास्तान फाटा या सर्व्हिस रोड वर कंटेनर, ट्रॅक, वाहने उभी असतात सर्वप्रथम त्यावर कायदेशीर कारवाई करावी व रस्ता मोकळा करावा अशी मागणी केली.
जेएनपीटी चे माजी विश्वस्त भूषण पाटील यांनी  उरणच्या जनतेसाठी त्वरित अत्याधुनिक सेवा सुविधाने युक्त सुसज्ज असे हॉस्पिटल बांधावे अशी मागणी केली व उरण मधील कोणत्याही रस्त्यावर अनधिकृत पार्किंग किंवा बेकायदेशीर वाहने दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी अशी मागणी केली. महेश भोईर(कळंबूसरे )यांनी कळंबूसरे गावातील शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या व नुकसान भरपाईची मागणी केली.ममता पाटील यांनी खोपटे येथे एनएमएमटी बस अपघातातील म्हात्रे कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली तसेच उरण तालुक्यातील भटक्या कुत्रांचा नसबंदी करून बंदोबस्त करण्याची मागणी केली. व हॉस्पिटल मध्ये कुत्रा चावल्यास त्याचे सर्व औषधे उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.
नरेश कोळी(हनुमान कोळीवाडा )यांनी जातींचे प्रमाणपत्र उरण तहसील कार्यालयात मिळत नाही. स्थानीकांना रोजगार उपलब्ध होत नाहीत. ३९ वर्षे उलटले तरीही हनुमान कोळीवाडाचा पुनर्वसनचा प्रश्न सुटत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. उरण शहरातील मार्केट मध्ये भाजी विक्रेते रस्त्यावर आपली दुकाने थाटतात याकडे लक्ष वेधले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नरेश कोळी यांनी केली.बोरी स्मशान भूमी येथे राहणारे दया परदेशी यांनी आम्हाला आठवड्यातून दोनदाच पाणी मिळते तेही फक्त अर्धा तास मिळते याकडे लक्ष वेधले. आपली समस्या मांडताना दररोज आपल्याला पाणी मिळावे व जास्त वेळ पाणी सोडण्यात यावे अशी मागणी दया परदेशी यांनी केली. सीमा घरत यांनी महिलांना प्रशिक्षण उपलब्ध करून रोजगार देण्याची मागणी केली.
कंपनीत होणारे भरती विषयी सर्वांना माहिती मिळावी, प्रत्येक गावात व शहरात किती बेरोजगार आहेत याचे सर्वेक्षण व्हावे, इंजिनिअर व मेडिकल कॉलेज उरण मध्ये व्हावे अशी मागणी सीमा घरत यांनी केली.दिव्यांग संघटनेचे महेंद्र म्हात्रे यांनी ग्रामपंचायतमध्ये निधी वाटप करताना विविध कडक नियम व अटी लादल्या जात आहेत त्या कमी कराव्यात. अटी शर्ती शिथिल कराव्यात. आमदार निधीतून दिव्यांग निधीचे वाटप त्वरित व्हावे. दिव्यांगसाठी स्वतंत्र सभागृह बांधावे, लघु  उद्योग स्थापन करावे, दिव्यांगचे जमीन संपादित झाले त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली.
समाधान म्हात्रे (गोवठने )यांनी शाळेचा प्रश्न निकाली काढावा तसेच रस्ते आदी विविध प्रश्न सोडविण्याची मागणी केली. संतोष ठाकूर यांनी एमएमआरडीए ने पनवेल उरण तालुक्यातील ३२ गावाचा समावेश असलेला महानगर प्रकल्प रद्द करावा, कोणताही प्रकल्प राबविताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, विरार अलिबाग कॉरीडोर प्रकल्प रद्द करावा अशी मागणी केली.अशा प्रकारे विविध नागरिकांनी आपले प्रश्न आमसभेत उपस्थित केले. त्या त्या प्रश्नावर विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. आमदार महेश बालदी यांनीही नागरिकांना प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
या आमसभेला सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विविध ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, विविध गावातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते. यावेळी आमसभेत विविध प्रलंबित विषयावर, प्रलंबित समस्येवर नागरिकांनी आवाज उठविला. नागरिकांच्या विविध समस्यांची, प्रश्नांची दखल घेत आमदार महेश बालदी तसेच विविध विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.या आमसभेत अनेक नागरिकांना प्रशासकीय अधिकाऱ्यांकडुन समाधान कारक उत्तरे न मिळाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र समस्या सोडविण्याचे आश्वासन मिळाल्याने अधिकारी वर्ग या समस्या कधी व कशा पद्धतीने  सोडविणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading