
नागोठणे ( महेंद्र माने ) :
नागोठणे येथील मुस्लिम बांधवांनी सोमवार, 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद हा सण मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा केला. या दिवशी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये सर्व जाती-धर्माचे बांधव सहभागी झाले होते. मिरवणुकीत सहभागी लोकांनी ईद-ए-मिलादच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
सकाळी मुस्लिम बांधवांनी नवीन कपडे परिधान करून मशिदीत जाऊन नमाज पठण केले. त्यानंतर हजरत मोहम्मद यांच्या संदेशांचे वाचन करण्यात आले आणि प्रार्थना करून उपस्थितांनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या. यानंतर सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मांडलेकर गल्ली, बाजार पेठ, खुमाचा नाका मार्गे मोहल्ल्यातून जात मिरवणूक अखेरीस मशिदीमध्ये नेण्यात आली, जिथे सलाम वाचन करून कार्यक्रमाची सांगता फतीहा देऊन आणि प्रसादाचे वितरण करून झाली.
या मिरवणुकीत मोलाना जव्वाद, नाझीम नालखंडे, लियाकत कडवेकर, अकलाक पानसरे, सिराज पानसरे, शब्बीर पानसरे, आसिफ मुल्ला, सुहेल पानसरे, पप्पूशेठ अधिकारी, याकुब सय्यद, अब्दुल दफेदार, गुलाम हुसेन पाटणकर, जुहेर कुरेशी, जिशान सय्यद, हुसेन पठाण, वासीम बोडेरे, समीर भिकन, काजीम पानसरे, मुझ्झफर कडवेकर आणि फयाज पानसरे यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.
ईद-ए-मिलाद निमित्ताने मशीद तसेच घरांवर विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली होती. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान सहा. पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीने नागोठणे शहरात धार्मिक एकतेचा संदेश दिला, ज्यामध्ये सर्व जाती-धर्माचे बांधव एकत्र येऊन सण साजरा करताना दिसले.