साखर गांवातील देशसेवेतून निवृत्त सैनिक पंढरीनाथ मालुसरे यांची साखर ग्रामस्थांकडून ओपन जीपमधून पितळवाडी फाटयापासून सपत्नीक मिरवणूक अन् साखर गावी सत्कार करण्यात येऊन पोलादपूर तालुक्यातील जवानांचा आदरसत्कार करण्याचा नवा पायंडा निर्माण करण्यात आला. बेळगाव येथे 6 मराठा लाईट इन्फ्रंट्रीमध्ये भारतीय सैन्यदलात भरती होऊन 22 वर्षांनंतर सेवानिवृत्त होऊन सैनिक पंढरीनाथ मालुसरे हे सहकुटूंब सहपरिवार गावी परतल्यानंतर साखर गावाने तालुक्यात प्रथमच अन्य जवानांच्या गावातील ग्रामस्थांनी आदर्श घ्यावा असा प्रघात निर्माण केला आहे.
प्रदीर्घ देशसेवेनंतर पंढरीनाथ मालुसरे यांचे जन्मगांव साखर येथे आगमन होणार असल्याने पितळवाडी फाटयापासून ग्रामस्थांनी विविध फुलांच्या हारांनी सजविलेल्या ओपन जीपमधून त्यांची सपत्नीक मिरवणूक काढली. यावेळी पितळवाडी नाक्यावर चालक मालक संघटनेच्यावतीने सेवानिवृत्त सैनिक पंढरीनाथ मालुसरे यांचे भव्य स्वागत लक्ष्मण महाराज खेडेकर, जनतादल सेक्युलरचे रायगड जिल्हाध्यक्ष भगवान साळवी, सचिन खेडेकर, शिवाजी मालुसरे, श्याम वरणकर, ज्ञानोबा कुंभार, स्वप्नील कुंभार, संदीप वरणकर, पंढरीनाथ जाधव, तुकाराम गायकवाड, विलास जाधव, लक्ष्मण केसरकर, मिलींद मालुसरे, राजू गायकवाड, विनायक केसरकर, दिपक पार्टे, संजय चोरगे, संतोष खेडेकर, भाऊ तुडीलकर आदींच्या उपस्थित करण्यात आले.
या मिरवणुकीदरम्यान महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप कामत यांनी सेवानिवृत्त सैनिक पंढरीनाथ मालुसरे यांना शुभेच्छा दिल्या. मिरवणुक साखरच्या ग्रामदैवतांच्या मंदिराजवळ आल्यानंतर सेवानिवृत्त जवान मालुसरे यांनी सहकुटूंब येऊन मनोभावे दर्शन घेतले. यानंतर एका छोटया शामियान्यामध्ये पंढरीनाथ मालुसरे यांचा साखर ग्रामस्थांतर्फे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
प्रस्तावनेमध्ये शिवसेना तालुकाप्रमुख अनिल मालुसरे यांनी शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या नरवीर सुर्याजी मालुसरे आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा लढाऊ वारसा सांगणाऱ्या देशसेवेतून निवृत्त सैनिक पंढरीनाथ मालुसरे यांनी बेळगाव, जम्मू काश्मीर- सांबा, नॉर्थ इस्ट सिक्कीम, पुणे, जम्मू काश्मीर-आखनूर, पश्चिम बंगाल, न्यू दिल्ली, मध्यप्रदेश, साऊथ सुदान, खंजळवान गुरेज सेक्शन, पठाणकोट येथे डयुटी बजावली. सांबा येथे 2004, नार्थ सिक्कीम बंकर येथे 2006, नॉर्थ इस्ट सिक्कीम लांचूग 2007, जम्मू काश्मीर आखनूर येथे 2012, युनायटेड नेशन्स दक्षिण आफ्रिका येथे साऊथ सुदान येथे 2017, जम्मू काश्मीर खंजळवान गुरेज सेक्शन 2019 या ठिकाणी विविध कालावधीत भारतीय सैन्यदलाच्या विविध ऑपरेशन्समध्ये महत्वाची कामगिरी बजावण्याची संधी मिळाली, असल्याची माहिती दिली. याप्रसंगी अनिल मालुसरे यांनी सुभेदार भाऊराव मालुसरे, अंबाजीराव मालुसरे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत चोरगे व रामचंद्र खोत, ग्यानबा खोत, मारुती सुतार, घावरे, सखाराम चोरगे, महादेव चोरगे अशी मोठी देशसेवेची तसेच समाजसेवेची परंपरा आहे, असे नमूद करून पंढरीनाथ मालुसरे यांच्या देशसेवेसाठी आयुष्य देऊन पितळवाडीत त्यांचे स्वागत झाल्यावर तालुक्यातील प्रत्येक सैनिकाला सन्मान मिळावा, अशी भावना आहे, असे मत मांडले.
याप्रसंगी देशसेवेतून निवृत्त सैनिक पंढरीनाथ मालुसरे यांचा सत्कार स्वराज्य युवा प्रतिष्ठानतर्फे तसेच माजी सैनिक नायब सुभेदार सुनील चोरगे, प्रदीप मालुसरे, उमरठचे कळंबे व माजी सैनिक रामदास कळंबे. महादेव चोरगे, कृष्णा चोरगे यांच्यातर्फे वैयक्तीकरित्या करण्यात आला. निवृत्त सैनिक पंढरीनाथ मालुसरे यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे सुभेदार मनोहर धनवट यांचादेखील याप्रसंगी सत्कार करण्यात आला. चंद्रकांतदादा मोरे, लक्ष्मण बुवा खेडेकर, चंद्रकांत घाडगे, तुकाराम मोरे गुरुजी, भगवानशेठ साळवी, युवक संघटनेचे सचिन खेडेकर, विष्णू सणस,मुंबई पोलीस शिवप्रसन्न पवार तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण कार्याध्यक्ष शैलेश पालकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
हजारो लोकांना तिर्थक्षेत्र आणि लक्ष्मणबुवा खेडेकर यांनी, पाण्यातला मासा झोपतो कसा?असा सवाल करीत आईवडील पाठिशी उभे असताना लेकराची झेप गरुडासारखी झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करताना सेवानिवृत्तीवेळी तालुक्यातील जवानांचा सन्मान करण्याचा साखर ग्रामस्थांचा प्रयत्न हा आदर्शवत् असल्याचे सांगितले. माजी सरपंच भरत चोरगे, ह.भ.प.चंद्रकांत घाडगे यांनी निवृत्त सैनिक पंढरीनाथ मालुसरे यांच्या गौरवपर भाषण केले. सत्काराला उत्तर देताना निवृत्त सैनिक पंढरीनाथ मालुसरे यांनी भारतीय सैन्यदलामध्ये भरती झाल्यानंतर मातृछत्र गमावले पण ग्रामदैवतांनी आपली काळजी घेऊन 22 वर्षांच्या सेवेनंतर सुखरूप गावामध्ये पोहोचविल्याबद्दल ॠण व्यक्त केले तसेच ग्रामस्थांनी मोठया प्रेमाने केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.