
आंगवली ( संदीप गुडेकर ) :
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख परशुराम वाडी येथील गावठी दारू धंदे स्थानिक पोलिसांच्या आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आशीर्वादाने बिनधास्तपणे सुरू असल्याचा आरोप आहे. हे धंदे मुख्यतः मारळ, बामणोली, हातीव, ओझरे बुद्रुक मार्गावर चालू असून, या दारूचे सेवन करून भाविक मार्लेश्वर मंदिरात जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
माजी सरपंच ललिता गुडेकर (बोडये), माजी सरपंच अंकिता गोंधळी (हातीव), आणि उपसरपंच दिनेश कांबळे (आंगवली) यांनी देवरुख पोलिस स्टेशनला याबाबत तक्रार दिली होती. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, अशी नाराजी स्थानिक नागरिकांमध्ये आहे.
या दारूच्या व्यसनामुळे आंगवली गावातील तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देवरुख, निवे बुद्रुक, आणि साखरपा या भागांमध्ये झुगार मटका देखील जोरात सुरू असून, त्यामुळे तरुण पिढी हानीग्रस्त होत आहे. अनेक तरुणांचे सुखी संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
महिला वर्गातून दारू आणि जुगार बंद करण्याची जोरदार मागणी होत आहे, कारण या व्यसनांमुळे अनेक कुटुंबांमध्ये नवरा-बायकोमधील वादविवाद वाढले आहेत. महिलांनी शासनाला विनंती केली आहे की, त्यांनी तातडीने या समस्या सोडवाव्यात आणि दारू व जुगार धंद्यावर कठोर बंदी घालावी, जेणेकरून कुटुंबांचे जीवन सुखी होईल.