
माथेरान ( मुकुंद रांजणे ) :
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठाच्या पक्ष श्रेष्ठींनी कर्जत खालापूर मतदार संघातील पक्षाचेच निष्ठावंत कार्यकर्ते नितीन सावंत यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे या पक्षाच्याच उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून माथेरान मधील शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देत पत्रकार परिषद घेऊन आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. आणि दुसऱ्याच दिवशी उबाठा गटाच्या पक्ष श्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाच्या उमेदवाराचे काम करणार आहोत असे माथेरान मधील उबाठा च्या नेत्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले होते. ह्या धरसोड प्रवृत्तीमुळे माथेरान मधील उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांना सुचेनासे झाले. अत्यंत द्विधा मनस्थितीमुळे येथील उबाठा गटाच्या समस्त कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाची वाट धरली आहे.
कार्यसम्राट विद्यमान आमदार महेंद्रशेठ थोरवे, शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, शहर संघटक मनोज खेडकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून दि.२६ ऑक्टोबर रोजी प्रभाग क्र.४ या वन ट्री हिल विभागातील उबाठा गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, उपशहर प्रमुख प्रमोद नायक, ज्येष्ठ शिवसैनिक रघुनाथ कदम, संपर्कप्रमुख निखिल शिंदे, शिवसैनिक योगेश जाधव, राकेश कोकळे, दिलीप कदम,उमेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत योगेश शिंदे, सुभाष सावंत,प्रशांत कदम,सखाराम खाडे, प्रथमेश मोरे,सचिन सुर्वे,पराग सुर्वे,अक्षय परब,अविनाश गोरे,मदन पाटील,रमेश जोशी, कैलास कदम, हॉटेल लेक व्ह्यू चे व्यवस्थापक
तिवारी यांनी जाहीर पक्षप्रवेश केला आहे.त्यामुळे शिवसेनेच्या उबाठा गटाला मोठा जबर धक्का बसला आहे. कार्यकर्तेच पक्षातून गेल्यावर फक्त ठरावीक नेतेच शिल्लक राहणार आहेत की काय अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
—————————————————-
कार्यकर्त्यांमध्ये दुजाभाव करणे, विभागातील लाइट, पाणी, रस्ते सुविधेसाठी लक्ष न देणे, कोणीही काही कोणा विरुद्ध सांगितले तर काहीही विचार न करता तोडून बोलणे, आमच्या विभागात मोठ्या प्रमाणात माळी कामगार आहेत. 1991 पासून माळी कामगारांच्या घराचा प्रश्न 5 वर्षे नगरपालिकेत व राज्यात सत्ता असून देखील त्यांचे प्रश्न न सोडविणे, काही मोजक्याच कार्यकर्त्यांना लाडकी वागणूक तर काहींना दुय्यम वागणूक देणे अशा बर्याच कारणांमुळे अक्षरशः कंटाळून आम्ही स्वेच्छेने शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे.
…योगेश शिंदे, पक्षप्रवेश कर्ते
—————————————————-
सत्तेत असताना छोटीसी कामे सुध्दा उबाठाच्या नेत्यांनी केली नाही. कायम आमचा वापर करून घेतल्यामुळे सध्या गावात शिंदे गटाची कामाची उत्तम पद्धत सर्वाना अभिप्रेत असल्याने आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून शिंदे गटाचे सदस्यत्व आनंदाने स्वीकारले आहे.
…सखाराम खाडे, माजी उबाठा कार्यकर्ते
—————————————————-
सत्तेचा पुरेपूर फायदा या लोकांनी घेतला होता. नगरपालिकेची लहानसहान कामे वाटप करताना आम्हाला नेहमीच कामातुन डावलले जायचे. त्यांच्या कुटुंबातील आणि जवळच्या लोकांना ही सगळी कामे दिली जात होती. आणि आमची कोणती कामे यांनी केली नाही त्यामुळे आम्ही वैतागून शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे.अजून बरेच जण काही दिवसांत शिंदे गटात समाविष्ट होणार आहेत.
…प्रथमेश मोरे, उबाठा माजी कार्यकर्ता