रायगड (अमुलकुमार जैन) :
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रायगड व भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय महाविद्यालय कार्यालय परिसरात ‘दिव्यांग आनंद मेळा’ मंगळवार (दि.२५) पासून आयोजित करण्यात आला आहे. हा मेळा २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. या ‘दिव्यांग आनंद मेळा’चे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ८० दिव्यांग बा़धवांना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले.
दिव्यांग बांधवांना आपल्याला असलेल्या दिव्यांगामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रायगड व भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांना त्यांच्या दिव्यांग प्रकाराप्रमाणे कुबड्या, कॅलिपर, श्रवणयंत्र, तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, जयपूर पाय हे साहित्य ‘दिव्यांग आनंद मेळा’ आयोजित करून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
‘दिव्यांग आनंद मेळा’ उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, शासकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी, मोहन साळुंखे, डॉ. मिनल जाधव, साईनाथ पवार उपस्थित होते.
———————————————
दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी शासन विविध योजना राबवित आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूरच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या ‘दिव्यांग आनंद मेळा’मध्ये दिले जाणारे साहित्य दिव्यांग बांधवांना उपयुक्त ठरेल असे आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही दिव्यांग बांधवांसाठी विविध उपक्रम हाती घेतले असून, दिव्यांग बांधवांना १०० टक्के अनुदानातून स्कूटी तसेच फिरत्या वाहनावरील दुकान उपलब्ध करून देण्यात येत आहेत.