दिवेआगर सरपंच सिद्धेश कोसबे यांना दै.नवराष्ट्रचा आदर्श सरपंच पुरस्कार; मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून अभिनंदन

Aditi Tatkare
बोर्ली पंचतन (मकरंद जाधव) :
दैनिक नवभारत समूहाच्या दैनिक नवराष्ट्र रायगड सन्मान २०२५ सोहळा पनवेल महानगरपालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि.२९ मार्च रोजी पार पडला. जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या समाजसेवी व्यक्तींना विविध मान्यवरांच्या हस्ते दैनिक नवराष्ट्र रायगड सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आलं.
श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ व तालुक्यातील पहिली आयएसओ मानांकन प्राप्त ग्रामपंचायत दिवेआगरचे लोकनियुक्त सरपंच सिद्धेश कोसबे यांनी आपल्या सुरुवातीच्या दोन वर्षाच्या कालावधीत गावामधील अंतर्गत रस्ते सुधारणा, शाळा,अंगणवाडी सुशोभीकरण, सामाजिक सभागृहांना सोयी सुविधा पुरवणे,पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन, कासव संवर्धन व कांदळवन निसर्ग पर्यटन प्रकल्प,स्थानिक तरुणांना पर्यावरण पूरक रोजगाराची संधी त्याचबरोबर पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पूरक साहित्य वाटप, प्राणायाम शिबिर,अशा विविध कार्यक्रमाच्या आयोजनाबरोबरच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाच्या हिताच्या दृष्टीने घेतलेले निर्णय या उल्लेखनीय कार्याबद्दल रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते त्यांना आदर्श सरपंच म्हणून नवराष्ट्र सन्मान पुरस्काराने सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आलं.
यावेळी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तथा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल दैनिक नवराष्ट्र समूहाचे आभार व्यक्त करून पुरस्कार प्राप्त मान्यवरांची जबाबदारी आता वाढली असून त्याची जाणीव ठेवून आपली यशस्वी वाटचाल अशीच पुढे सुरू राहावी अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर, दै.नवराष्ट्रचे कार्यकारी संपादक संजय मलमे, नवभारत समूहाचे महाप्रबंधक सचिन फुलपगार आदी मान्यवर उपस्थित होते.
सिध्देश कोसबे यांना दैनिक नवराष्ट्रचा आदर्श सरपंच सन्मान मिळाल्याबद्दल पंचक्रोशीतून त्यांचं कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading