दिवेआगर ग्रामपंचायतीला आयएसओ 9001:2015 सन्मान प्रदान

Borli Iso

बोर्ली पंचतन ( मकरंद जाधव ) : 

श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असणाऱ्या दिवेआगर ग्रामपंचायतीला एस. आर.सर्टिफिकेट संस्थेच्या माध्यमातून गुरुवार दि.२६ सप्टेंबर रोजी संस्थेचे लीड ऑडिटर किरण भगत यांच्या हस्ते राज्याच्या महिला, बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवेआगर येथे आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्रदान करण्यात आलं.
“जागतिक गुणवत्ता प्रणाली” या चाचणीमध्ये दिवेआगर ग्रामपंचायतीनं आपला सहभाग नोंदवून कंपनीच्या निकषानुसार तीन महीन्यात ग्राम.पं.च्या कार्यालयाची कामकाज पद्धत, स्वच्छता,नागरिकांना मिळणारी वागणूक,शासकिय योजनांची माहिती व त्याची अंमलबजावणी,आरोग्यसेवा, पाणी,रस्ते,दिवाबत्ती,वृक्षारोपण, शिक्षण व इतर मुलभूत सुविधा पुरविणे,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या निकषांवर हा सन्मान प्राप्त केला.
यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद असून गावाचं अभिनंदन करताना सांगितलं की मी राज्यभरातील मोठ्या ग्रामपंचायतींना भेट देत असते तिथे तिथे दिवेआगर गावाचा उल्लेख आवर्जून करते. हे पर्यटन स्थळ असल्याने गावाची व समुद्र किनाऱ्याची स्वच्छता ठेवाल तेवढा पर्यटकांचा ओघ वाढेल.ही सर्वांची जबाबदारी आहे. दिवेआगरचे सुवर्ण गणेश मंदिर हे आपल्या सर्वांच्या अस्तित्वाचा भाग आहे.समुद्रकिनाऱ्या बरोबरच सुवर्ण गणेश मंदिराला सुद्धा पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात.त्याच्याच कृपा आशीर्वादाने येथे सुख-समृद्धी नांदत आहे.
श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरील खेकडा व कोलंबी प्रतीकृती सेल्फी पॉईंटच्या धर्तीवर दिवेआगर येथे असलेल्या कासव संवर्धनाच्या अनुषंगाने कासवाची प्रतिकृती उभारण्याचा मानस असून जे जे स्कूल ऑफ आर्ट येथे ती तयार असून त्यासाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध केल्यास ती लवकरात लवकर उभारण्यात येईल असा शब्द दिला.एस.आर. सर्टिफिकेट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि लीड ऑडिटर किरण भगत यांनी सांगितलं की ही जागतिक मानांकन संस्था असून त्याचे कार्यालय स्वित्झर्लंड येथे आहे.वस्तू व सेवा यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार मानांकन दिले जाते.
सहजासहजी हे मानांकन मिळत नाही.महाराष्ट्र शासनाने २०१९ साली एक शासन निर्णय काढला की राज्यातील अठ्ठावीस हजार पाचशे ग्रामपंचायती या आयएसओ म्हणजेच गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत आल्या पाहिजे मी अपेक्षा करतो की तालुक्यातून टॉप टेन ग्रामपंचायती तरी आयएसओ मानांकन झाल्या पाहिजे.मी अभिमानाने सांगू इच्छितो की, या याबाबत रायगड जिल्हा हा प्रथम क्रमांकवर आहे रायगड जिल्ह्यातील ५०९ ग्रामपंचायतीं पैकी ११३ ग्रामपंचायतींनी आयएसओ सन्मान प्राप्त केला आहे.ग्रामस्थांकडे काही संकल्पना असतील तर त्याचा उपयोग गावासाठी करा.मी स्वतःला भाग्यवान समजतो की या कोकणामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली त्याचबरोबर मंत्री अदिती तटकरे यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करुन ग्रामपंचायतीच्या प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या
.ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक शंकर मयेकर यांच्या संकल्पनेला सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य,ग्राम.पं.कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचं लाभलेलं सहकार्य यामुळे हा सन्मान प्राप्त झाला असुन आयएसओ. ९००१:२०१५ हे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळवणारी दिवेआगर ही श्रीवर्धन तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.यामुळे ग्रामपंचायतीच्या नावलौकिकात भर पडली असून गावासाठी व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी हा अभिमानास्पद क्षण असल्याच्या भावना सरपंच सिद्धेश कोसबे यांनी व्यक्त केल्या.त्याचबरोबर सुवर्ण गणेशाच्या पुन:प्रतिष्ठान सोहळ्या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी एक कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली होती त्याची पूर्तता लवकरात लवकर व्हावी अशी मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या वतीने अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी महेश पाटील,तहसीलदार महेंद्र वाकलेकर, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, मंडळ अधिकारी सुनील पाटील,उपसरपंच वसीम फगजी,ग्रामसेवक शंकर मयेकर व दिनेश रहाटे,लालाभाई जोशी,उदय बापट,प्रकाश दातार,महंमद मेमन,दर्शन विचारे ग्राम.पं.सदस्य,कर्मचारी, ग्रामस्थ आणि महीला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading