मुंबई : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या 81 व्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत दादर, मुंबई येथे 21 मे या दिवशी संपन्न झालेल्या हिंदू एकता दिंडीत हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन हिंदु राष्ट्राचा जयघोष केला. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हयांतील 1 हजाराहून अधिक हिंदू बांधव जात, प्रांत, भाषा, संघटना, संप्रदाय, पक्ष आदी सर्व बिरुदावले बाजूला ठेऊन पारंपारिक वेश परिधान करून, भगवे झेंडे हातात धरून घोषणा देत या दिंडीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
या हिंदू एकता दिंडीमध्ये वसई (मेधे) येथील श्री परशुराम तपोवन आश्रमाचे संचालक भार्गवश्री बी.पी.सचिनवाला, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू (सुश्री) अनुराधा वाडेकर आणि पू.(सौ.) संगीता जाधव या संतांची वंदनीय उपस्थिती लाभली. विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय वारकरी परिषद, परशुराम तपोवन आश्रम (वसई), इस्कॉन, श्री योग वेदांत सेवा समिती, श्री शिवकार्य प्रतिष्ठान (विक्रोळी), वज्रदल, हिंदी भाषिक जनता परिषद, व्यापारी संघ-दादर, धर्मजागरण मंच, हिंदु गोवंश रक्षा समिती; स्वधर्म फाऊंडेशन, हरि ओम् नेपाळी समाज, नेपाळी विश्वकर्मा समाज, नेपाळी जन कल्याण, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी हिंदुत्वनिष्ठ, सामाजिक संघटना, संप्रदाय आणि मंडळे यांचे पदाधिकारी तसेच भाजपचे कार्यकर्ते झाले होते.
दादर (प.) येथील कबूतरखान्याच्याजवळील ब्राह्मण सेवा मंडळ चौक येथून सुरु झालेल्या या हिंदू एकता दिंडीचा आरंभ शंखनाद आणि धर्मध्वजाच्या पूजनाने झाला. या दिंडीतील श्री मुंबादेवी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या पालखीचे भाविकांनी भावपूर्ण दर्शन घेतले. दिंडीच्या मार्गात ठिकठिकाणी सुवासिनी महिलांनी देवीचे औक्षणही केले. सनातन संस्थेच्या वतीने हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत या हिंदू एकता दिंडीच्या आयोजनासह गेली एक महिना ठिकठिकाणी मंदिर स्वच्छता, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांना साकडे घालणे, साधना प्रवचने असे उपक्रमही राबवण्यात आले. ‘हिंदू एकता दिंडी’ची सांगता शिवाजी पार्कजवळील चौकात झाली. यावेळी मान्यवर वक्त्यांनी हिंदूसंघटनाची आवश्यकता अधोरेखित करून एकत्रितपणे राष्ट्र आणि धर्मकार्य करण्याचे आवाहन केले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.