दक्षिण रायगड शिवसेना वाद पेटला, अनेक निष्ठावंत राजीनामा देण्याच्या तयारीत

Shivsena Ubatha
पोलादपूर ( शैलेश पालकर ) : 
रायगड जिल्हयातील दक्षिणेकडील श्रीवर्धन आणि महाड मतदार संघातील महाड, पोलादपूर, माणगांव, म्हसळा, तळा व श्रीवर्धन या सहा तालुक्यांच्या दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख पदासाठी वर्णी लागल्याची घोषणा मुखपत्रासह काही वृत्तवाहिन्यांवरून होताच शिवसेनेच्या निष्ठावंतांमध्ये जोरदार नाराजीची लाट पसरली असून अनेक पदाधिकारी राजिनामे देण्याच्या मानसिकतेत असल्याचे काहींनी प्रस्तुत प्रतिनिधीस संपर्क करून सांगितले आहे.
शिवसेना संघटनेमध्ये दुफळी झाल्यानंतर काही निष्ठावंत शिवसैनिक पदाधिकाऱ्यांवर दक्षिण रायगडसह जिल्हा संघटना पूर्ववत बांधणीसाठी मातोश्रीवरून विश्वासाने जबाबदारी सोपविण्यात आली. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे यांनी या घडामोडींनंतर पक्षसंघटना शाबूत ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यानंतर तत्कालीन दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून उमेदवारी केल्याने त्यांना संघटनेतून दूर करण्यात आल्याचे तातडीने जाहिर करण्यात आले होते. मात्र, संघटनेची ताकद कायम ठेवण्यात येऊनही निष्ठावंतांना डावलण्यात आल्याची भावना काही तासांमध्ये दक्षिण रायगडमध्ये पसरू लागली आहे.
महाड आणि श्रीवर्धन या दोन्ही मतदार संघामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर पराभवाची नाराजी दूर करून आगामी रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने शिवसैनिकांच्या मुलाखती घेऊन दक्षिण रायगड जिल्हाप्रमुखपदी वर्णी लागण्याची अपेक्षा असताना अचानक मुखपत्रातून म्हसळा येथील नंदू शिर्के यांची निवड झाल्याचे जाहिर झाल्याने महाड विधानसभा मतदार संघातील महाड, पोलादपूर व माणगांव तालुक्यांतील निष्ठावंत शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
या नाराजीचे रूपांतर भविष्यात सामूहिक राजिनाम्याचे सत्रात होण्याची शक्यता काही नाराज पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना उबाठा पक्षातून महाविकास आघाडीतील घटक पक्षामध्ये गेलेल्या आणि घटक पक्षातून शिवसेना उबाठा पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी वेगवेगळे नियम लावणाऱ्या पक्षसंघटनेने निष्ठावंत पदाधिकाऱ्यांसाठीही योग्य निकष लावून संघटनात्मक जबाबदारी देण्याची अपेक्षा असल्याचे यावेळी नाराज पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा पक्षाचे काही कार्यकर्ते महायुतीतील घटक पक्षाकडे आकर्षित होऊनही त्यांची नाराजी दूर करण्यात आल्याच्या भूमिकेनंतर निष्ठावंतांच्या नाराजीचे कारण दूर करण्यासाठी वरिष्ठ नेतृत्व कोणती भूमिका घेणार याकडे महाड व श्रीवर्धन मतदार संघातील निष्ठावंतांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading