
संगमेश्वर ( संदीप गुडेकर ) :
तिल्लोरी कुणबी समाजाचा ओबीसीमध्ये समावेश अखेर झाला आहे, ज्यामुळे अनेक वर्षांपासून या समाजाला न्याय मिळाल्याचे मानले जात आहे. बळीराज सेनेचे अध्यक्ष अशोकदादा वालम यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. बळीराज सेनेचे उपाध्यक्ष सुरेश भायजे यांनी या निर्णयाचे स्वागत करत तिल्लोरी कुणबी समाजाच्या न्यायप्राप्तीसाठी वालम यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.
आजही रत्नागिरी जिल्ह्यात दारिद्र रेषेखालील एकूण कुटुंबांची संख्या ३,३५,३१८असून त्यामध्ये कुणबी ,तिलोरी कुणबी यांची संख्या २,१९,८५४.आहे म्हणजेच संख्येच्या ६५.५६%आहे. यावरूनच रत्नागिरी जिल्ह्यात बहुसंख्य असणाऱ्या कुणबी, तिलोरी कुणबी कुटुंबाच्या सामाजिक स्थितीचा अंदाज करता येईल की, आजही रत्नागिरी जिल्ह्यातील तिलारी कुणबी समाजाकडे एक टक्काही शासकीय नोकऱ्या अथवा उद्योगधंदे नाहीत.
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर तिलोरी कुणबी समाजाचा ओबीसीमध्ये समावेश
तिलोरी कुणबी समाजाला ओबीसीमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी बळीराज सेनेचे अध्यक्ष अशोकदादा वालम यांच्या नेतृत्वात मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्य मागासवर्ग आयोगाने या समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला होता, ज्याला २३ सप्टेंबर २०२४ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी मिळाली.
कुणबी समाजाच्या ऐतिहासिक संघर्षाचे फलित; अखेर ओबीसीमध्ये तिलोरी कुणबींचा समावेश
तिल्लोरी कुणबी समाजाला ओबीसीमध्ये स्थान मिळवण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष सुरू होता. १९३३ साली ब्रिटिश राजवटीत समाजाला ओबीसीमध्ये नोंद करण्यात आली होती, परंतु २००४ मध्ये त्यांना त्या यादीतून वगळण्यात आले होते. बळीराज सेनेच्या प्रयत्नांमुळे अखेर हा प्रश्न मार्गी लागला आहे.