अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी ! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, त्या वेळी प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून दीपावली उत्सव सुरू आहे.
सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखात दीपावलीचे अध्यात्मशास्त्र जाणून घेऊया. दीपावलीसारखा सण शास्त्र म्हणून साजरा केला, तसेच तो साजरा करतांना होणारे अपप्रकार टाळले तर आपल्याला चैतन्याची अनुभूती घेता येईल. श्री लक्ष्मी, श्रीकृष्ण आणि यमदेव आदींचे स्मरण करून हा दीपोत्सव शास्त्रानुसार साजरा करून आनंद द्विगुणित करूया !
दिवाळीतील दिवसांचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), आश्विन अमावास्या (लक्ष्मीपूजन) आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलीप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते. काही जण त्रयोदशीला दिवाळीत न धरता, दिवाळी उरलेल्या तीन दिवसांची आहे, असे समजतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात, म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः ते सण वेगवेगळे आहेत. दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व थोडक्यात समजून घेऊया.
वसुबारस आणि गुरुद्वादशी : आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते. यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. याच तिथीला गुरुद्वादशीच्या निमित्ताने शिष्य गुरूंचे पूजन करतात.
धनत्रयोदशी (धनतेरस) :
आश्विन वद्य त्रयोदशीच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारी वर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते. साधनेसाठी अनुकूलता आणि ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी या दिवशी धनलक्ष्मीची पूजा करतात. वर्षभर योग्य मार्गाने धन कमवून वार्षिक उत्पन्नाचा १/६ भाग धर्मकार्यासाठी अर्पण करावा.
यमदीपदान :
या दिवशी यमदीपदानाला विशेष महत्व आहे. अकाली मृत्यू कुणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (काही जण तेरा दिवे लावतात) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते. फक्त या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. त्यानंतर पुढील प्रार्थना करावी – ‘धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंड यातून माझी सुटका करावी.’
धन्वंतरि जयंती :
आयुर्वेदाच्या दृष्टीने धनत्रयोदशी हा दिवस धन्वंतरि जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे ‘प्रसाद’ म्हणून देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरि हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. या दिवशी तोच धन्वंतरि प्रसाद म्हणून देण्यात येतो.
नरक चतुर्दशी :
नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणार्या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. श्रीकृष्णाने नरकासुराला ठार मारले, याचे स्मरण करून श्रीकृष्णाला प्रार्थना करावी, ‘माझ्यातील नरकरूपी पापवासना आणि अहं यांचा नाश करून माझा ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुलभ कर.’ या दिवशी ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते तसेच प्रदोषकाळी दीपदान करतात. ज्याने प्रदोषव्रत घेतले असेल, तो प्रदोषपूजा आणि शिवपूजा करतो.
लक्ष्मीपूजन :
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध अन् ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी आहे. या दिवशी श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व कार्यरत असते. या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी श्री लक्ष्मीदेवीची पूजा यथासांग करावी.
बलीप्रतिपदा :
कार्तिक शुद्ध प्रतिपदा (दिवाळी पाडवा). श्रीविष्णूने ही तिथी बलीराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला ‘बलीप्रतिपदा’ म्हटले जाते. अत्यंत दानशूर, परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. हा ‘विक्रम संवत’ कालगणनेचा वर्षारंभदिन म्हणून साजरा करतात. या दिवशी अभ्यंगस्नान करून स्त्रिया पतीला ओवाळतात. या दिवशी गोवर्धन पूजा करतात. नवीन वस्त्रालंकार घालून, पक्वानांचे भोजन करून आनंद साजरा करतात.
भाऊबीज (यमद्वितीया) :
कार्तिक शुद्ध द्वितीया हा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला; म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे नाव मिळाले. या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल, तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून त्याला ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळावे. अपमृत्यू निवारणार्थ ‘श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ।’ असा संकल्प करून यमाच्या चौदा नावांनी तर्पण करावे. हा विधी पंचांगात दिलेला असतो. याच दिवशी यमाला दीपदान करायचे असते.
हल्ली दिवाळी सणात रात्री उशिरापर्यंत कानठळ्या बसणारे व मोठ्या आवाजाचे फटाके फोडले जातात. यातून ध्वनी आणि वायू प्रदूषण तर होतेच तसेच जीवित आणि वित्तहानीच्या घटना सुद्धा फटाक्यांमुळे घडतात. फटाक्यांमध्ये लक्ष्मीबार, कृष्णबार, नेताजी सुभाषचंद्र बाँब आदी देवता व राष्ट्रपुरूष यांची चित्रे असलेले फटाके सुद्धा फोडले जातात. देवता आणि राष्ट्रपुरुषांचे चित्र असलेले फटाके वाजवल्यावर त्या चित्रांचे तुकडे इतरत्र पडून त्यांचा अनादर होतो आणि धर्महानी केल्याचे पातक लागते. फटाक्यांवर खर्च होणारे पैसे राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी अर्पण करा ! दिवाळी हा सण पावित्र्याचा, मांगल्याचा, आनंदाचा आहे. दिवाळीच्या दिवसांत अधिकाधिक साधना (म्हणजेच नामजप, प्रार्थना, सत्सेवा, दान आदी) करण्याचा प्रयत्न करावा. याचा साधना करणाऱ्या व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होईल !
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.