‘जलजीवन’चे पेडणेकर रावसाहेब रिटायर होताहेत? निरोपसमारंभातच मुदतवाढीचे वेंगुर्लेकरांकडून संकेत

Pedenekar Engener
पोलादपूर ( शैलेश पालकर ) : 
जलजीवन मिशन योजनेंतर्गत ‘हर घर नळ’ देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार तालुक्यातील 53 कोटींच्या 57 नळपाणीयोजनांवर काम करणारे पेडणेकर रावसाहेब रिटायर होत असल्याने त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन लोहारमाळ येथील एका फार्महाऊसमध्ये करण्यात आले. मात्र, पोलादपूर तालुक्यातील काही प्रस्तावित विस्तारित नळपाणीयोजना पूर्ण होण्यासाठी पेडणेकर रावसाहेबांसारख्या कर्तव्यदक्ष अभियंत्यांची आवश्यकता असल्याचे सांगून पेडणेकरांना एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी निरोपाच्या भाषणामध्ये केली आणि वरिष्ठ अभियंता वेंगुर्लेकर यांनी त्यांच्या भाषणात 30 जून 2025 पर्यंत पेडणेकर रावसाहेबांना मुदतवाढ देण्याचे संकेत दिले. यामुळे पोलादपूर तालुक्यातील उपस्थित पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांना ‘जलजीवन’चे पेडणेकर रावसाहेब रिटायर होताहेत? की कसे याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
पोलादपूर तालुक्यातील अलिशान फार्महाऊसमध्ये झालेल्या ‘जलजीवन’चे पेडणेकर रावसाहेब यांच्या निरोप समारंभाला त्यांनी पाणी पाजलेल्या विविध गावातील लोकप्रतिनिधी, सरपंच, राजकीय कार्यकर्ते तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थित होती. व्यासपिठावर जलजीवनचे वरिष्ठ अभियंता वेंगुर्लेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख निलेश अहिरे, पंचायत समितीचे माजी सदस्य यशवंत कासार, मोरगिरीचे माजी सरपंच जगन्नाथ वाडकर, कृउबा संचालक लक्ष्मण मोरे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिप्ती गाट तसेच विविध अधिकारी तसेच पेडणेकर रावसाहेब व त्यांच्या सौभाग्यवती उपस्थित होते.
यावेळी लक्ष्मण मोरे, यशवंत कासार यांनी पेडणेकर रावसाहेब यांच्या पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, राजिपचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी पेडणेकर रावसाहेबांची पोलादपूर तालुक्यातील सर्व नळपाणी योजना कार्यान्वित होण्यासाठी तसेच प्रस्तावित विस्तारित नळपाणी योजना मार्गी लागण्यासाठी गरज असल्याचे सांगून त्यांना निरोप देण्याऐवजी एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली. यावेळी जलजीवनचे वरिष्ठ अभियंता वेंगुर्लेकर यांनी पेडणेकर रावसाहेबांची खरच पोलादपूर तालुक्याला गरज असेल तर निश्चितच वरिष्ठांकडे पाठपुरावा करून केवळ एप्रिलपर्यंतच नव्हे तर जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्याकामी पाठपुरावा करू, अशी ग्वाही देताना आता निरोप समारंभ झालाच आहे तर पेडणेकरांनी पत्नीसोबत सेवानिवृत्तीचा तात्पुरता आनंद घेण्यासाठी पर्यटन करायला जाऊन पुन्हा सेवेत सहभागी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या निरोपाला उत्तर देताना पेडणेकर रावसाहेबांनी, पोलादपूर तालुक्यातील माता भगिनींची पाण्यासाठी वणवण पाहून सिंधुदूर्ग जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील खेडेगावामध्ये जन्मलो असून आई व बहिणीला पाण्यासाठी दूरवर जावे लागत असल्याची आठवण झाली. यामुळेच पोलादपूर येथील सेवाकाळामध्ये जी काही जनतेची सेवा झाली; त्यामुळेच एवढया मोठया प्रमाणात निरोप देण्यासाठी गर्दी जमल्याबद्दल ॠणी असल्याचे सांगितले.
यानंतर सुमारे पाचशेहून अधिक निमंत्रित कर्मचारी, ठेकेदार, ग्रामसेवक, पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायतींचे सरपंच व पदाधिकारी यांनी साग्रसंगीत डिनरचा मनमुराद आनंद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading