“जमिनी दिल्या, रोजगार का नाही? – कामगार दिनी महेंद्रशेठ घरत यांचा एचपीसीएलला जाब”

"जमिनी दिल्या, रोजगार का नाही? – कामगार दिनी महेंद्रशेठ घरत यांचा एचपीसीएलला जाब"
उरण (विठ्ठल ममताबादे) : 
१ मे जागतिक कामगार दिनानिमित्त, एचपीसीएल गेटसमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी भेट देऊन ठेकेदार व व्यवस्थापनावर जोरदार हल्ला चढवला. “भूमिपुत्रांनी आपली जमीन कवडीमोल दराने प्रकल्पासाठी दिली आहे, त्यामुळे त्यांचा रोजगारावर प्रथम हक्क आहे. या स्थानिक कंत्राटी कामगारांना कामावरून काढणे हा अन्यायच नव्हे तर गुन्हाच आहे,” असे तीव्र शब्दांत त्यांनी मत व्यक्त केले.
घरत म्हणाले, “कंपनी व्यवस्थापन कंत्राटदारांना किती रक्कम देते आणि कंत्राटदार कामगारांना किती पगार देतो, याची चौकशी होणे आवश्यक आहे. व्यवस्थापनाच्या संमतीशिवाय शोषण कसे शक्य आहे? आणि कामगारांनी संघटना बांधली, तर त्यात चूक काय आहे? कामगारांना कायद्यानुसार वेतन मिळायलाच हवे.”
एचपीसीएलमध्ये गेल्या १० महिन्यांपासून २१ स्थानिक कंत्राटी कामगार बेरोजगार झाले आहेत. हे अत्यंत लाजिरवाणे असल्याचे सांगून, या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे घरत यांनी जाहीर केले.
“मध्यंतरी आमदार महेश बालदी यांनीही ठेकेदारांना समज दिली होती, तरीही जर ते ऐकत नसतील तर यापुढे आम्हीही तुम्हाला तुमची जागा दाखवू,” असा इशाराही त्यांनी दिला.
ही आंदोलनात्मक चळवळ न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, ज्यामध्ये २१ बेरोजगार कामगार गेल्या चार दिवसांपासून एचपीसीएलच्या गेटसमोर साखळी उपोषण करत आहेत.
महेंद्रशेठ घरत यांनी कामगार दिनी प्रत्यक्ष हजेरी लावून कामगारांशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शनही केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading