महाराष्ट्राला प्राणवायू पुरवणारा विभाग म्हणजे सह्याद्री आणि या सह्याद्रीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कोकण, कोकणातील जंगलं आणि पर्यावरण हे अख्ख्या महाराष्ट्राला प्राणवायू पुरवतो याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे असं प्रवचन देवाची आळंदी येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज सावर्डेकर यांनी भालगाव येथील दत्त मूर्ती वर्धापन दिन सांगता सोहळ्याच्या कीर्तनातून केलं.
मुरुड तालुक्यातील भालगाव येथे दत्तमूर्ती वर्धापन दिन सोहळ्याच्या अनुषंगाने ६ ते ९ एप्रिल दरम्यान भालगाव ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळ यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन करण्यात आलं.
या हरिनाम सप्ताहामध्ये रोहा उप वनसंरक्षक शैलेंद्रकुमार जाधव,सहाय्यक वनसंरक्षक राहुल चौबे, मुरुड वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली भालगाव परिमंडळ वन अधिकारी दिनेश दिघे यांच्या संकल्पनेतून ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज सावर्डेकर यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून वन वणव्यामुळे हवेचं होणारं प्रदूषण,वनस्पती आणि वन्यजीवांच धोक्यात येणार जीवन,मानवी मालमत्तेचे होणारं नुकसान याबाबत जनजागृती करण्यात आली.
आमच्या जीवनामध्ये आम्ही कधीही विनाकारण वृक्षतोड करणार नाही. जंगलातील वृक्ष,वेली यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊ. कोणत्याही वन्य प्राण्याला आमच्याकडून त्रास होणार नाही. जंगलाला कधीही आग लावणार नाही.
जर आम्हाला वणवा लागलेला दिसला तर आम्ही सुद्धा वन संरक्षणार्थ वणवा विझविणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपल्या परिसरातील वन्यजीव आणि वनसंवर्धन पर्यायाने पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला स्वतःला समर्पित करू. असं शपथरुपी आवाहन ज्ञानेश्वर महाराज सावर्डेकर यांनी ग्रामस्थांना केलं. खारआंबोली,शिघ्रे येथील स्थानिक ह.भ.प. कीर्तनकार यांनी सुद्धा प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृती केली.
या हरिनाम सप्ताह सोहळ्याला मुरुड पंचक्रोशीतील जोसरांजन, तेलवडे,लक्ष्मीखार,उंडरगाव, महालोर,खारआंबोली,शिघ्रे, त्याचबरोबर भालगाव येथील श्री नरेंद्र महाराज संप्रदाय,वारकरी आणि ग्रामस्थांचं सहकार्य लाभलं.
याप्रसंगी भालगाव परिमंडळ वन अधिकारी दिनेश दिघे,वनरक्षक रुपाली पाटिल,ओमकार कदम, प्रशांत पाटिल,प्रथमेश पाटील, वन मजूर दिलीप पवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.