कोणतेही काम करताना आनंदाने आणि प्रभावशाली करण्याच्या भूमिकेतून आयुष्य जगलो. पेपर विकणे, वडापाव विकणे, अलिशान गाडया स्वच्छ करणे असो अथवा शौचालय साफ करण्याचा देखील मनापासून आनंद घेत संबंधितांची प्रशंसा मिळवली. हिच भूमिका चित्रपट दिग्दर्शनासाठी देखील कायम ठेवल्याने टपाल, लालबागची राणी आणि आता छावा चित्रपटाचे दिग्दर्शन करताना कायम ठेवल्याने छावा चित्रपटाचे प्रचंड यश आणि प्रभाव जनमानसावर दिसून आला आणि सर्वत्र चित्रपटाची चर्चा होऊ शकली आहे, असे प्रांजळ मत पोलादपूर तालुक्यातील मोरसडे गावातील भोसाडवाडी येथे भव्य सत्कार प्रसंगी चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी व्यक्त केले.
पोलादपूर शहरासह तालुक्यात ठिक ठिकाणी चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा उस्फुर्तपणे स्वागत सत्कार करण्यात आला. मोरसडे या मुळगावी उतेकर भावकी, कांगोरीगड माध्यमिक विद्यालय आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्यावतीने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची पायी चालत भव्य सवाद्य मिरवणूक करण्यात आली. उतेकर कुलदेवता मंदिरासमोरील सभागृहामध्ये लक्ष्मण उतेकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर श्रीकांत उतेकर, भिवाशेठ उतेकर, तुकाराम उतेकर, तुकाराम केसरकर, अनिल मालुसरे, गणपत उतेकर, चंद्रकांत केसरकर, दशरथ घाडगे, कृष्णा सणस, कांगोरीगड माध्यमिक विद्यालय सुभाष ढाणे, विजय दरेकर, दत्ता उतेकर तसेच लक्ष्मण महाराज खेडेकर बुवा आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये श्रीकांत उतेकर यांनी लक्ष्मण उतेकर हे त्यांच्या चुलत्यांसोबत मुंबईत कामधंद्यानिमित्त गेल्यानंतर कोणत्याही कामाला कमी लेखले नाही आणि उपजीविका सुरू ठेवली याच दरम्यान त्यांनी वेगवेगळया क्षेत्रांमध्ये पडेल ते काम हाती घेऊन तडीस नेण्याचे सांगितले. देशात कमाईच्या बाबतीत सातव्या क्रमांकावर असलेला छावा चित्रपट दिग्दर्शित करताना तिच्या दोन चित्रपटाचा अनुभव गाठीशी ठेवून प्रचंड मेहनतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर शेवटच्या मृत्यूप्रसंगापर्यंत बारकावे सादर करून एक अजरामर कलाकृती निर्माण केली आहे असे सांगितले.
याप्रसंगी व्यासपीठावरील विविध मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या वाडवडिलांच्या आठवणी आणि त्यांचा साधेपणा याबाबत अनेकांनी माहिती दिली. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दत्तात्रय उतेकर यांनी लक्ष्मण उतेकर यांच्या हस्ते इमारतीच्या बांधकामासाठी सर्वात आधी 15 हजार रुपयाची देणगी मिळाल्याचे सांगितले.
लक्ष्मण महाराज खेडेकरबुवा यांनी, अध्यात्मिक संदर्भ देत लक्ष्मण उतेकर यांच्या छावा चित्रपटाची चर्चा गिरनार पर्वतावर पायऱ्या चढताना भाविकांच्या ऐकल्यानंतर अभिमानाने उर भरून आले असे सांगून लक्ष्मण उतेकर यांच्या यशाने त्यांच्या पूर्वजांचाही नावलौकिक झाला असल्याने उत्तेकर कुलदेवतांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम राहतील, अशा शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पोलादपूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक संस्था, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे, शंकर बांदल, प्रमोद उतेकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर, डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी संदीप जाबडे व सिध्देश पवार, स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्ते यांनी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा सपत्नीक सत्कार केला.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.