जगभरात ‘छावा’ या छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे पोलादपूर तालुक्यातील सडे गावातील रहिवासी लक्ष्मण उतेकर यांच्या गावांतील शिवकालीन कांगोरीगडावर प्रथमच यावर्षी बुधवारी दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दुर्लक्षित कांगोरी गडाचा शिवकालीन इतिहास सर्व शिवभक्तांपर्यंत पोहचावा यासाठी प्रथमच कांगोरीगड विकास मंडळ आयोजित बुधवार 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती सोहळा उत्सवाचे आयोजन कांगोरीगड (मंगळगड) येथे करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी साडेसहा ते आठ वाजेपर्यंत जननी आई गावदेवी मंदिर ते कांगोरीगड यावेळेत पालखी सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून नंतर सकाळी साडेआठ ते नऊ यावेळेत ध्वजारोहण पूजन होणार आहे. यानंतर सकाळी नऊ ते दहा या वेळेत कांगुरमाल व शिवप्रतिमा पूजन व आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर अकरा ते दुपारी एक यावेळेत गडभ्रमंती, स्वच्छता मोहीम केली जाणार असून शेवटी दुपारी दीड ते तीन यावेळेत महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे. कांगोरीगड विकास मंडळ यांच्यावतीने अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सर्व समाजातील शिवप्रेमींनी या शिवजयंती सोहळयास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजक कांगोरीगड विकास मंडळ मु. सडे, ता. पोलादपूर, जि. रायगड यांच्यावतीने करण्यात आले आहे. या दुर्लक्षित कांगोरीगडाचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी स्थानिक शिवभक्त गावकरी एकवटले असून त्यासर्वांनी स्व: खर्चातून व स्वत: परिश्रम करून पुढे येऊन पडझड झालेल्या कांगोरी गडाला सावरण्यासाठी हातभार लावला आणि सर्व तेथील बांधकाम पुनर्जीवित करण्यासाठी तसेच गडावर लाईट व इतर सुविधा स्थानिक शिवभक्त यांनी पुढाकार घेऊन उपलब्ध केल्या आहेत.
कांगोरीगडचा मंगळगड इतिहास
महाड आणि पोलादपूर तालुक्याच्या सीमेवरील गड चंद्रराव मोरे यांच्याकडून हा ‘कांगोरीगड’ हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि याचे नामकरण ‘मंगळगड’ असे केले. मात्र, अद्याप छ.शिवाजी महाराजांनी ठेवलेले हे नांव परिसरातही प्रचलित झाले नाही. त्याकाळी प्रामुख्याने कैदी ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. छ. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर रायगडास वेढा पडला; तेव्हा तेथील धनसंपत्ती प्रथम कांगोरीगड येथे हलवून त्यानंतर पन्हाळा किल्ल्यावर नेली. इ.स.1817 या मध्ये सरदार बापू गोखले यांनी मद्रास रेजीमेंट मधील कर्नल हंटर व मॉरीसन या इंग्रज अटक करुन मंगळगडावर तुरुंगात ठेवले होते. इ.स 1818 मध्ये कर्नल प्रॉथर या इंग्रजाने हा किल्ला जिंकला.
गडभ्रमंतीची माहिती
महाडपासून दीड तास अंतरावरील पिंपळवाडी इथून जवळ-जवळ कांगोरीगडाच्या अर्ध्यापर्यंत चारचाकी वाहन जाऊ शकेल असा कच्चा रस्ता काही वर्षांपूर्वी तत्त्कालीन आ.भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने बांधण्यात आला आहे तर दुसरा रस्ता हा पोलादपूर या तालुक्याच्या ठिकाणापासून अंदाजे 24-25 किलोमीटर अंतर असलेल्या सडे या गावातून आहे. सडे गावाच्या पुढे काही अंतरावर वडघर गावातून सुध्दा गडावर जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. पोलादपुरातीलाच ढवळे या गावातून कांगोरीगडावर जाण्यासाठी 6 तास लागतात. एकाच मोहिमेत चंद्रगड आणि कांगोरीगडावर चढाई करायची असल्यास गिर्यारोहक हा मार्ग अवलंबतात. वरंध घाटातील माझेरी या गावातून 6 तासांचे अंतर आहे. कांगोरीगडाकडे जाणाऱ्या गुराखी सांगू शकतील अशा ढोरवाटा असंख्य आहेत.
मात्र, प्रत्यक्षात या सर्व एकाच ठिकाणी साधारणत: येऊन गडाकडे जाण्याची एकच वाट दिसते. स्थानिक नवरा-नवरीचे सुळके म्हणतात अशा नैसर्गिक ट्वीन टॉवरप्रमाणे सुळक्यांच्या खालून गडावर जाण्याची एकमेव वाट जाते. हा सुळका नजरेच्या टप्प्यात ठेवला तर गिर्यारोहकांसाठी कुठूनही वाट शोधून गडावर चढाई करता येईल. पिंपळवाडीतून जाणारी गडावर जाणारी वाट ही प्रसिध्द मळवाट आहे आणि आता तिकडून गडावर जाण्यासाठी अर्धा रस्तासुध्दा बांधला असला तरी साहसाची आवड असणाऱ्या तरुण साहजिकच सडे या गावातून चढाई करतात. केवळ दोन तासांत शर्थीचे प्रयत्न केल्यास चढाई पूर्ण होते.
सडे गावातील चित्रपट क्षेत्रातील मातब्बर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी यापूर्वी ‘टपाल’ हा राष्ट्रीय पॅनोरमात गाजलेला चित्रपट निर्माण करीत दिग्दर्शन केला. अलिकडेच बहुचर्चित ‘छावा’ या सिनेमाने भारतातील अनेक चित्रपट गृहामध्ये एकाच दिवशी प्रसारित होऊन कमाईचा 235 कोटींचा आकडा गाठून उच्चांक गाठला. यामुळे सडे गावातील या कांगोरीगडावर छत्रपती शिवजयंती उत्सवाचे आयोजन पहिल्यांदाच होण्याला अनन्यसाधारण महत्व आले आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.