किल्ले रायगडच्या या प्रतिकूल परिस्थितीत लाखोंच्या संख्येने शिवभक्त मिळेल त्या वाहनाने, सायकलवरुन, काहीजण चालत या शिवराज्याभिषेक सोहोळयाला येतात. इतके प्रेम जगात कोणाला कुठेही पहायला मिळत नाही, पण हे कोणासाठी, तर ज्यांनी आपल्यासाठी स्वराज्य स्थापन केले, त्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांसाठीच. कारण त्यांनी स्वत:साठी राज्याभिषेक केला नाही, तर हे स्वराज्य जनतेसाठी स्थापन केले.
अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी न्यायाची भूमिका घेणे, हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते, असे मत मांडताना छत्रपती संभाजीराजे यांनी, सरकार अनेक ठिकाणी करोडो रुपये खर्च करीत असते. आमदार खासदारही आपल्या मतदार संघात हजारो कोटी रुपये आणतात. छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ले संवर्धनासाठी 2 हजार कोटी सरकारने द्यावेत, असे आवाहन यावेळी छ.संभाजीराजे यांनी सत्तेत असणारे आणि नसणारे यांना 350 व्या शिवराज्याभिषेकदिन सोहळयाप्रसंगी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि हरिनामाचा गजर अशा शक्ती आणि भक्तीच्या संगमात आज किल्ले रायगडवर 350 वा शिवराज्याभिषेक सोहोळा शिवभक्तांच्या अलोट गर्दीत आणि अपूर्व उत्साहात साजरा झाला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने या सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी दुपारी पाचाड येथील राजमात जिजाउंच्या समाधीला अभिवादन करून युवराज संभाजी छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती शहाजीराजे छत्रपती पायरी मार्गाने किल्ले रायगडवर रवाना झाले. महादरवाजा पूजन आण गडपूजनझाल्यानंतर युध्दकला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी बुधवारी सायंकाळी रायगडचा परिसर भारावून गेला होता.
आज गुरुवारी सकाळी युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते नगारखाना येथे ध्वजारोहण करून शिवराज्याभिषेकाच्या मुख्य सोहोळयाला प्रारंभ झाला. श्री शिवछत्रपतींच्या पालखीचे राजसदरेवर आगमन झाल्यानंतर राज्याभिषेक विधी सुरु करण्यात आले. युवराज संभाजी छत्रपती महाराज आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते उत्सवमूर्तीला जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. तर मेघडंबरीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीस युवराज संभाजी छत्रपती महाराज योनी सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि कर्तृत्व जगभरात पोहोचण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे शिवराज्याभिषेक सोहोळा साजरा करण्यात येणार आहे. त्याला तमाम शिवभक्तांच्यावतीने आपल्याला निमंत्रित करण्यात आल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी दिली. यावेळेस इंग्रज हेन्रीची वेशभूषा करुन एक आपला शिवभक्त आज आला आहे. त्यांनी त्याच वेशभूषेत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा केला, पण मी आपल्याला सांगू इच्छितो की, पुढील वर्षी इंग्लंडचा राजदूत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी किल्ले रायगडवर आणला जाईल, अशी ग्वाही छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी दिली.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड यांच्यावतीने आयोजित केलेल्या या शिवराज्याभिषेक सोहळयास युवराजकुमार शहाजीराजे, युवराज्ञी संयोगिताराजे, खा.ओमराजे निंबाळकर, आ. रोहित पवार, माजी आ. अनिकेत तटकरे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील, संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज देहूचे प्रशांत महाराज, शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर, माजी अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, शिवव्याख्याते यशवंत गोसावी, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आदी मान्यवर आणि समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी किल्ले रायगडावर प्रहार संघटनेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.