
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
तालुक्यातील अनेक ग्रामस्थांकडून विविध विकासकामांची मागणी केल्यानंतर जुनी विकासकामे भुईसपाट करताना त्यातील काही भाग व अवशेष पुन्हा वापरात आणून नवीन कामांमध्ये बेमालूमपणे वापरणाऱ्या बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदारांसाठी तालुक्यातील काही भंगार आणि अवशेष चोरांकडून बिल्डींग मटेरियल सप्लाय करण्याचे सौहार्दपूर्ण सहकार्य केले जात असते. याचाच भाग म्हणून दिवील आणि लोहारे येथील केटी बंधारे पोलादपूरच्या उत्तरवाहिनी सावित्री नदीला येणाऱ्या पुराला कारणीभूत ठरवून भुईसपाट करण्याची मागणी दोन महिन्यांपूर्वी भंगार व अवशेष चोरांच्या सूचनेवरून शासनअमान्य डिजिटल माध्यमांकडून करण्यात आली होती.
दिविल आणि लोहारमाळ येथे तब्बल 35 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या दोन कोल्हापुरी तंत्राच्या बंधाऱ्यांपैकी दिविलचा बंधारा जीर्ण झाला असताना 2005 च्या अतिवृष्टीमुळे आलेल्या उत्तरवाहिनी सावित्री नदीच्या महापुरामध्ये वाहून गेला तर लोहारमाळच्या बंधाऱ्याला नदीच्या पात्रात वाहून आलेल्या झाडांच्या खोडांचे हादरे बसून तो कमकुवत झाला. त्यानंतर काही काळाने बंधाऱ्याची डागडुजी करताना हिवाळी आणि उन्हाळी या बंधाऱ्याखालून नदीच्या उथळ पात्रातून एस.टी.च्या गाडयांसह अन्य प्रकारची वाहतूक सुरू झाली.
हे काम संपल्यानंतर आजमितीस बंधाऱ्यावरून वाहतूक सुरू राहिली असून या बंधाऱ्यावरून एस.टी.ची गाडी अथवा लाकडाचे ओंडके भरलेले ट्रक जाऊ लागले की हा बंधारा थरथरत असल्याचा थरारक अनुभव अन्य वाहनांतील प्रवाशांसह बंधाऱ्यावरून चालत जाणाऱ्या पादचाऱ्यांनाही घ्यावा लागत असे. यापैकी लोहारे येथील केटी बंधाऱ्यालगत लोहारे तुर्भे पुलाचे बांधकाम होऊन तो कार्यान्वितही झाला आहे. मात्र, दिविल येथील केटी बंधारा 2005 साली अतिवृष्टी व महापूराच्या काळात फुटला आणि नादुरूस्त झाल्याने वाहतुकीस व रहदारीस अयोग्य ठरला आहे.
पोलादपूर शहरालगतच्या चरई गावापर्यंत पुर्वी होडीने प्रवासी वाहतूक केली जात असताना उन्हाळी सावित्री नदीच्या उथळ पात्रातून पायपीट करून चरईपर्यंत ये-जा केली जात असे. यानंतर तत्कालीन रायगडचे पालकमंत्री प्रभाकर मोरे यांनी चरई येथे जाण्यासाठी पुलाची मंजूरी आणून पुल साकारली. या पुलाच्या दोन्ही बाजूच्या ऍप्रोच रोडसाठी करण्यात आलेल्या भरावामुळे पोलादपूर शहरालगत वाहणारी उत्तरवाहिनी सावित्री नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागल्यानंतर या भरावावर आदळून पोलादपूर शहरातील उत्तरेकडील लोकवस्ती तसेच जुन्या महाबळेश्वर रस्त्यावर पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असे.
गेल्या काही वर्षांमध्ये 2005 साली तसेच 2021 साली या चरई पुलाच्या चरई गावालगतच्या एॅप्रोच रोडचा भराव वाहून गेल्याने दोनवेळा ऍप्रोच रस्त्याचे बांधकामदेखील करण्यात आले. मात्र, गेल्या तीन वर्षांपुवी पोलादपूर तालुक्यातील काँक्रीटचे रस्ते, लोखंडी पुल, खडी व लालमाती तसेच इमारतीचे अवशेष यांचा वापर सर्रास सरकारी विकास कामांमध्ये करणाऱ्यांनी काही महिन्यांपासून दिवील आणि लोहारे येथील कोल्हापुरी तंत्राच्या म्हणजेच केटी बंधाऱ्यांमुळे पोलादपूर शहरात पुरस्थिती निर्माण होत असल्याच्या चर्चा घडविल्या. मात्र, प्रत्यक्षात या दोन्ही केटी बंधाऱ्यांवरून उत्तरवाहिनी सावित्री नदीच्या पुराचे पाणी वाहात असल्याने हे दोन्ही बंधारे पोलादपूर शहरातील पुरास कारणीभूत नसल्याचे उघड आहे.
लोहारमाळ गावाच्या हद्दीतील कोल्हापुरी तंत्राच्या बंधाऱ्याचा उपयोग सध्या तुर्भे खोंडा, तुर्भे बुद्रुक, तुर्भे खुर्द, वझरवाडी, दिविल आणि हावरे भागात जाण्यासाठी तेथील ग्रामस्थ करीत असताना त्याठिकाणी नवीन लोहारे तुर्भे पुल उभारण्यात आला. या पुलाच्या उत्तरेला पुर्वीचा केटी बंधारा आहे. त्यामुळे पोलादपूर चरई पुलानंतर लोहारेतील नवीन पुल आणि त्यानंतर लोहारे केटी बंधारा तसेच तेथून दोन कि.मी अंतरावर दिविल येथील केटी बंधारा असल्याने या पुलांमुळे पोलादपूर शहरातील पुरस्थिती कशी निर्माण होईल, असा सवाल तालुक्यातील सूज्ञ जनतेला सतावू लागला असताना या केटी बंधाऱ्यांना चांगल्या दर्जाचे तोडीचे ताशीव दगड असून ते दगडी इमारत आणि लोडबेअरिंग जोत्याच्या बांधकामांना उपयुक्त असल्याने दोन्ही केटी बंधारे पोलादपूरच्या पुरस्थितीला कारणीभूत असल्याची चर्चा घडवून नजिकच्या काळात दोन्ही केटी बंधारे पाडून परस्पर त्यांची वासलात लावण्याचा डाव भंगार व अवशेषांचा विकास कामे आणि भरावासाठी वापर करणाऱ्यांकडून होणार असल्याचे संकेत काही बांधकाम व्यावसायिकांकडून देण्यात येत आहेत.
पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथे केटी बंधाऱ्यासंदर्भातील कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून बंद झाले असून दिवील आणि लोहारे या दोन्ही बंधाऱ्यांची देखभाल दुरूस्ती तसेच जबाबदारी रामभरोसे झाली आहे. यामुळे हे दोन्ही केटी बंधारे रातोरात गायब करण्यात येण्याची शक्यताही तालुक्यात व्यक्त होत आहे.