‘घरपट्टी वाढीच्या शॉक’ बातमीने उडविली नागरिकांची भंबेरी; विरोधी गटनेत्यांचे पत्र तर मनसे आक्रमक

Poladpur Nagarpanchayat
पोलादपूर ( शैलेश पालकर ) : 
नगरपंचायत पोलादपूरकडून ‘घरपट्टीवाढीचा शॉक’बातमी PEN न्यूजमध्ये प्रसिध्द झाल्यानंतर नागरिकांमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. नागरिक संभ्रमात असताना मनसेकडून जनजागृतीसाठी विचारविनीमय सभा आणि नगरपंचायतीचे विरोधीगटनेता यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून नागरिकांच्या संतप्त भावना अवगत करून दिल्या आहेत.
पोलादपूर शहरातील विविध प्रभागांतून नगरपंचायतीने नेमलेल्या खासगी ठेकेदाराकडून दोन-चार तरूणांमार्फत दोन वर्षांपूर्वी नागरिकांच्या घरांची मोजणी लेझर यंत्राद्वारे झाल्यानंतर घरांचे पुनर्मुल्यांकन करण्याची प्रक्रिया संबंधित ठेकेदाराने पूर्ण करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965चे कलम 106 अ अन्वये सन 2027-29 मध्ये आकारण्याच्या मालमत्ता कराची रक्कम अनाकलनीयरित्या निर्धारित केली आहे. त्या रक्कमेच्या 20 टक्के रकमेची आकारणी घरपट्टी म्हणून सन 2024-25 मध्ये आकारण्यात येणार आहे.
या रक्कमेमध्ये इमारत 30 ते 50 वर्षे जुनी असल्याकडे दूर्लक्ष करून नवीन असल्याचा गैरसमज कायम ठेऊन पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी म्हणजे 2025-26, 2026-27 आणि 2027-28 या वर्षी या इमारतींना घसारा 0 टक्के ठेवण्यात येणार असून त्यानंतर काही टक्के घसारा वजा करण्याचे उपकार 80 टक्के अधिक घरपट्टी आकारणीवेळी होणार आहे. ही घरपट्टीवाढीची गंभीर बाब लेझर मशिनने मोजणीदरम्यान नगरपंचायत पोलादपूरच्या सर्वच सत्ताधारी व विरोधी नगरसेवक आणि अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी नागरिकांपासून लपवून ठेवल्याचे आता उघड झाले आहे.
पोलादपूर नगरपंचायतीचे विरोधी गटनेता दिलीप भागवत यांनी नगरपंचायतीच्या प्रभारी मुख्याधिकारी महोदयांना पत्र लिहून या घरपट्टीवाढीविरोधात जनता तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याने या आंदोलनामध्ये सहभागाची मानसिकता दर्शविली आहे. या बातमीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरअध्यक्ष दर्पण दरेकर यांनीदेखील याविषयी जनजागृती करण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करून प्रयत्न करीत शनिवार दि. 30 मे 2024 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्क कार्यालयालगतच्या सभागृहामध्ये आयोजन केले आहे.
पोलादपूर नगरपंचायतीच्या नोटीसांमुळे पोलादपूरचे नागरिक पूर्णत: भांबावले असून काय करायचे आणि काय नाही याबाबत नागरिकांना योग्यतऱ्हेचे मार्गदर्शन न झाल्यास अज्ञानी गरीबास दुप्पट घरपट्टी आणि जाणकार मोठया क्षेत्रफळाच्या मालमत्ताधारकास हरकत योग्य तऱ्हेने नोंदविल्यास कमी घरपट्टी आकारली जाण्याचा विरोधाभास निर्माण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading