भातकापणीनंतर गवताचे भारे आणि भाताच्या मळणीनंतर भात भरडण्यासाठी देण्यापूर्वी भाताच्या बुंध्यातील मुळं खाण्यासाठी रानडुक्करांच्या झुंडी गावोगाव रात्री फिरत असून या रानडुक्करांपासून कोणतेही मोठे नुकसान होण्यापूर्वी शिकारीच्या परवानगीची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मार्गशिर्ष महिन्यानंतर पुढच्या पंधरवडयात देव पारधीला निघणार असल्याने गावपारधीच्या प्रथेत मोठया प्रमाणात रानडुक्करांसह उपद्रवी वन्यजीवांचा नायनाट केला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भारतातील सुमारे 18 राज्यांमध्ये रानडुक्कर, माकड, नीलगायी, हरीण, काळवीट तसेच अन्य शेतीला उपद्रवी प्राण्यांच्या शिकारीस परवानगी असताना तसेच पिक आणि मनुष्यांस धोकादायक असलेल्या वन्यजीवांचा प्रतिबंध करताना शिकारीचे मांसभक्षण करण्यायोग्य असल्यास वनविभागाच्या अधिकाऱ्यांना त्या शिकारीतील मृत वन्यजीवांच्या प्रेताची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा नसताना शेतकऱ्यांनी ते खाल्यास गैर काय, असा सवाल उपस्थित करीत परवानगी देण्यात आली आहे.
यादरम्यान, वनक्षेत्रातील शिकारीला प्रतिबंधित करण्याचा वन्यजीव संरक्षण अधिनियम अबाधित ठेवण्यात आल्याचे निर्विवाद सत्य कायम असताना कृषी क्षेत्रातील उपद्रवी वन्यजीवांच्या शिकारीसाठी शेतकरीवर्गाने मागणी केली आणि शिकारीनंतर वन्यजीवांचे मांस भक्षण करण्यायोग्य असल्यास तशी कृती केल्यास त्यास कायदेशीर मुभा नैसर्गिक न्यायतत्वाने देण्यात यावी, अशी न्याय्य मागणी राज्याचे तत्कालीन वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आल्यानंतर दि. 14 जून 2019 रोजी क्रमांक कक्ष 23(4)-प्र.क्र.69(14-15)967 या पत्रान्वये राजपत्रात नमूद केलेल्या वन अधिकाऱ्यांनी शिकारीचे आदेश निर्गमित करताना (परिपत्रकातील सूचना क्रमांक 02 वगळून) परवानगी देण्यास आदेश दिला आहे. शेतपिकास धोकादायक ठरलेल्या रानडुक्कर आणि रोही म्हणजेच नीलगायी यांचा बंदोबस्त करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्याने आता पोलादपूर तालुक्यातील रानडुक्करांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवता येणार आहे.
सध्या सुरू असलेल्या मार्गशिर्ष महिन्यानंतर पुढच्या पंधरवडयात पौष पौर्णिमेपासून देव पारधीला जाणार असल्याच्या जुन्या रूढपरंपरेतून शिकार म्हणजेच पारध करण्याची परंपरा तत्कालीन दंडकारण्यात म्हणजे सध्याच्या महाड, पोलादपूर, महाबळेश्वर, जावळी, खेड, मंडणगड, दापोली अशा तालुक्यामध्ये पाहण्यास मिळते. या तालुक्यांच्या ग्रामीण भागांमध्ये सध्या रानडुक्करं, मोर, लांडोरी, रानकोंबडे, ससे, साळींदर, भेकर अशा वन्यजीवांची सर्रास पारध करण्याचा प्रकार गावपारधीच्या स्वरूपात सुरू होणार आहे.
ग्रामीण भागातील ही परंपरा चिकन आणि मटनाच्या वाढत्या दरामुळे आता जनाधार मिळवू लागली असून उच्छाद घालणाऱ्या व झपाटयाने संख्या वाढणाऱ्या रानडुक्करांच्या शिकारीला पोलादपूर तालुक्यात तातडीने वनविभागाने परवानगी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, इलेक्ट्रीक शॉक देऊन रानडुक्कर मारण्याच्या प्रयत्नात काही वर्षापूर्वी आदिवासी समाजातील तरूणाला नाहक जीव गमवावा लागल्याच्या घटनेनंतर बंदूकधारी शिकाऱ्यांमार्फत रानडुक्करांचा बंदोबस्त करण्याची मागणी होऊ लागली आहे.
पोलादपूर शहर व परिसरातील गावांमध्ये माकडांचा हैदोस वाढल्याने पारंपरिक फळबागांद्वारे फलोत्पादन करण्याच्या व्यवसायाचा ऱ्हास झाला आहे. मात्र, माकडांबाबत शिकारीऐवजी पिंजरा लावून माकडांना पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये म्हणजेच दूर जंगलात सोडण्याची मागणी शहर व परिसरातून जोर धरू लागली आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.