होळी पौर्णिमेच्या आधीच्या रात्री हळकुंड जमविण्यापासून सुरू झालेला होलिकोत्सव बुधवारी पोलादपूरच्या ग्रामदैवतांच्या ग्रामप्रदक्षिणेनंतर आनंदउत्साहात पूर्णत्वास गेला. मंगळवारी भैरवनाथनगर सहाणेवर शागिर्दांनी मर्दानी खेळ सादर करताना तलवारबाजी, लाठी-काठी बनाटीसह दांडपट्टा व आगीच्या गोळयांचीही प्रात्यक्षिके सादर केली. बुधवारी शहराच्या विविध नगरातील भाविकांना ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ, जोगेश्वरीदेवी आणि रवळनाथाच्या पालखीचे मनोभावे दर्शनासह खणानारळाची ओटी भरून स्वागत करण्याचा उत्साह व्यक्त करता आला.
पोलादपूरच्या भैरवनाथनगर सहाणेवर गेल्या बुधवारपासून सुरू झालेला पोलादपूरच्या ग्रामदैवतांचा होलिकोत्सव तब्बल सातव्या दिवशी ग्रामप्रदक्षिणेनंतर श्रीकाळभैरवनाथ, जोगेश्वरीदेवी आणि रवळनाथ हे ग्रामदैवत पालखीतून देवस्थानामध्ये पोहोचले. सात दिवसांच्या उत्सवामध्ये उत्साह आणि भक्तीभावाचे दर्शन मोठया प्रमाणात दिसून येत होते तर सातव्या दिवशी सप्तरंगांची उधळणही रंगपंचमीच्या सणासोबत पोलादपूरकरांनी अनुभवली. मंगळवारी रात्री देवाचा गोंधळ घालण्यात आला तसेच बळीप्र्रथेची परंपरा राखण्यात आली.
यावेळी संतोष भुवड, अमोल भुवड आणि मंगेश गोरे यांच्या शागिर्दांनी मर्दानी खेळ सादर करताना तलवारबाजी, लाठी-काठी बनाटीसह दांडपट्टा व आगीच्या गोळयांचीही प्रात्यक्षिके सादर केली. रॉकेल ओतून पेटवलेले आगीचे गोळे फिरवताना चित्तथरारक शिवकालीन युध्दकलेचे प्राविण्य अनेक तरूण-तरूणी व बालकांच्या सफाईदार सादरीकरणातून दिसून येत होते.
यानंतर ग्रामप्रदक्षिणेसाठीच्या नियोजनाची बैठक सरपंच बाबूराव महाडीक यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होऊन प्रदक्षिणेचे मार्ग व व्यवस्थापन याबाबत चर्चा होऊन उपाध्यक्ष ज्ञानदेव पार्टे यांनी सर्वांना शुभेच्छा देत समारोप केला. यानंतर नैवेद्याचा लाभ पहाटे चार वाजेपर्यंत शेकडो ग्रामस्थांनी घेतला आणि पहाटे सावंतकोंड पार्टेकोंडकडे ग्रामदैवतांची पालखी प्रदक्षिणेसाठी रवाना झाली.
पोलादपूर शहरामध्ये ग्रामदैवतांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर सर्व नगरांतील दर्शनाच्या ठिकाणी ग्रामस्थ महिला व तरूण-तरूणांची लक्षणीय गर्दी दिसून आली. रंगपंचमीच्या सप्तरंगाच्या उधळणीसोबत फटाक्यांची आतषबाजीदेखील ठिकठिकाणी होत असल्याने तसेच खालूबाजाची सोबत मिळाल्याने शहरात रंगोत्सवाचेही उधाण आले. पूर्वेकडे मार्गस्थ झालेली नगरप्रदक्षिणा दक्षिणेकडील नगराच्या विविध भागातून पुन्हा पुर्वेकडील श्रीकाळभैरवपाथ देवस्थानामध्ये पुन्हा ग्रामदैवतं स्थानापन्न झाली. सात दिवसांचा होलिकोत्सव सप्तरंगाच्या उधळणीनंतर आनंद उत्साहामध्ये संपूर्ण झाला. यानंतर जत्रोत्सव 9 एप्रिलला असल्याने नियोजनाची बैठक लवकरच लावण्यात येणार असल्याचे देवस्थानचे सरपंच बाबूराव महाडीक यांनी सांगितले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.