गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, या तयारीदरम्यान मनसेच्या एका पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टरवर तब्बल अनेक वर्षांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह प्रबोधनकार ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांचेही फोटो झळकत आहेत. विशेष म्हणजे, शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून राज ठाकरेंनी कधीच बाळासाहेबांचा फोटो त्यांच्या पक्षाच्या कोणत्याही प्रचारसाहित्यावर वापरलेला नव्हता.
बाळासाहेबांनी स्वतःच “माझा फोटो वापरायचा नाही” असे सांगितले होते, त्यामुळे मनसेने आतापर्यंत ही मर्यादा पाळली. मात्र, आता बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राज्य सरकारने थोर व्यक्तींच्या यादीत समाविष्ट केल्यानंतर त्यांचा फोटो कुणीही वापरू शकतो, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता.
शिंदे गट सतत बाळासाहेबांचा फोटो वापरत असतो, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (ठाकरे गट) कडूनही त्यांचा वारंवार उल्लेख होतो. आता मनसेनेही बाळासाहेबांचा फोटो आपल्या प्रचारात समाविष्ट केल्याने हे तिसरे मोठे राजकीय गट बनले आहे, जे बाळासाहेबांचा वारसा पुढे नेण्याचा दावा करत आहेत.
राज ठाकरे यांनी 27 नोव्हेंबर 2005 रोजी शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर, 9 मार्च 2006 रोजी मनसेची स्थापना केली. त्यानंतर मनसेने कधीच बाळासाहेबांचे फोटो प्रचारात वापरले नव्हते. मात्र, गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने हे समीकरण बदलले आहे का, याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.