रायगड जिल्यातील अलिबाग पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या खंडाळे ग्राम पंचायत हद्दीमध्ये असणारी मिळकत नावावर फिरवून घेण्यासाठी खोटे दस्तऐवज दाखल केल्याप्रकरणी खंडाळे ग्राम पंचायतने अलिबाग पोलिस ठाण्यात वासिमा वसीम साखरकर व अविनाश विश्वानाथ नाईक यांच्याविरुद्ध निवेदनाद्वारे सरपंच नचिकेत कावजी आणि ग्राम विकास अधिकारी योगीराज मनवर यांनी तक्रार केली आहे.
खंडाळे ग्राम पंचायतचे सरपंच नचिकेत कावजी आणि ग्राम विकास अधिकारी योगीराज मनवर यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,वसीमा वसीम साखरकर यांनी ग्रुप ग्रामपंचायत खंडाळे येथे २१/१०/२०२४ रोजी घर क्रमांक २८३ ही मिळकत अविनाश विश्वनाथ नाईक यांचे नावे असून सदरहू मिळकत वसिमा वसीम साखरकर यांचे नावे नोंद फिरवून घेणेकामी अर्ज सादर करीत असताना दिनांक १०/१०/२०२४ रोजीच्या नोंदणीकृत दस्ताची प्रत जोडली होती.
वसीमा वसीम साखरकर यांनी तक्रार अर्जासोबत जोडलेल्या दस्तऐवज याची तपासणी केली असता सदर दस्त क्रमांक ४६४८/२०२४ मधील पृष्ठ क्रमांक ११/५५ पाहीले असता आश्चर्याचा मोठा धक्का बसला. सदर पृष्ठ क्रमांक ३१/५५ वर सरपंच ग्रुप ग्रामपंचायत खंडाळे यांचा दाखला जोडण्यात आला असून त्यामध्ये मजकूर लिहीला आहे की, सदर दाखला देण्यात येतो की अविनाश विश्वनाथ नाईक रा. खंडाळे ह्यांच्या स्वतः च्या मालकीचे घर अ.क्र. ३५८ घर क्र. २८३ सदर घर गेली चाळीस वर्षे मोडकळीत अवस्थेत आहे. (नादुरूस्त) सदर दाखला प्रत्यक्ष पहाणी करून दिला असे.” सदर मजकूर हा ग्रुप ग्रामपंचायत खंडाळे नामक लेटर हेडवर लिहिण्यात आला असून सदर दाखल्याची दिनांक हि ०८/०५/२०२४ अशी असून सदर दाखल्याच्या वरील डाव्या बाजूस अशोक नारायण थळे उपसरपंच व उजव्या बाजूस रंजना रंविद्र नाईक सरपंच यांची नावे असून दाखल्याच्या खालील बाजूस सरपंच यांचा शिक्का व सही आहे तसेच सदर दाखल्याचा जावक क्रमांक हा ७२८/२०२४ असा लिहिण्यात आला आहे.
सदर दाखल्याची ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी त्यांचे कार्यालयातील अभिलेख तपासला असता सदरचा दाखला हा बोगस दिला असल्याचे दिसून आले. दिनांक १७/११/२०२३ पासून सदर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच या पदावर नचिकेत कावजी हे कार्यरत असून बोगस दाखल्यावरील तारीख हि ०८/०५/२०२४ अशी आहे. तसेच सदर दाखल्यावरील जावक क्र. ७२८/२०२४ तपासला असता सदर जावक क्र. ७२८/२०२४ हा तहकूब ग्रामसभा अजेंडा असल्याचे लक्षात आले.
सदर बोगस दाखल्यावरील माजी सरपंच रंजना रविंद्र नाईक यांच्या सही व शिक्याची शहानिशा करण्याकरीता माजी सरपंच रंजना नाईक यांना ग्रामपंचायतीकडून दिनांक २७/१२/२०२४ रोजी जावक १२२०/२०२४ अन्वये पत्र देण्यात येवून खुलासा करण्याबाबत पत्र देण्यात आले होते. त्यावर माजी सरपंच रंजना रविंद्र नाईक माजी सरपंच खंडाळे यांनी ०२/०१/२०२५ रोजी ग्रामपंचायतीला पत्राव्दारे कळविले की सदर दाखल्याची त्यांनी बघितली मात्र सदर दाखल्यावर केलेली सही ही त्यांची नसून सदर दाखला हा खोटा व शासनाची दिशाभूल करणारा आहे तसेच रंजना नाईक यांचा सरपंच पदाची कारकीर्द हि दिनांक १७/०७/२०२३ रोजी संपूष्टात आल्यानंतर त्यादिवसापासून त्यांनी कोणताही दाखला त्यांचे सहीने दिलेला नाही.
शासनाच्या महसूल विभागाच्या अखत्यारीतील ग्रामपंचायत खंडाळे या शासकीय कार्यालयाचे बनावट लेटर हेड तयार करून त्यावर सरपंचांचा बनावट शिक्का तयार करून तसेच माजी सरपंच यांची कारकीर्द संपल्यानंतरही विद्यमान सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांची दिशाभूल करून बेकायदेशीर रित्या दस्त क्र. ४६४८/२०२४ मध्ये खोटा दाखला देण्यात आलेला आहे.
सदर तक्रारीची दखल घेण्यात येवून दोर्षीवर भारतीय न्यायसंहिता २०२३ नुसार योग्य त्या फसवणूकीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सरपंच नचिकेत कावजी आणि ग्राम विकास अधिकारी योगीराज मनवर यांनी केली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.