
खेड :
बुधवार दिनांक 11 सप्टेंबर ते शनिवार 15 सप्टेंबर रोजी तामिळनाडू येथे झालेल्या दुसऱ्यांदा महिला अस्मिता खेलो इंडिया तायक्वाँडो स्पर्धेत रोटरी स्कूलच्या कु. विधी दिपक गोरे हिने कांस्य पदक पटकावून दुसऱ्यांदा पदक विजेती होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.
कु. विधी दिपक गोरे ही इ. 10 वी मध्ये शिकत असून तिला तायक्वाँडो खेळाची खूप आवड आहे. सन 2023 मध्ये राष्ट्रीय खेलो इंडिया तायक्वाॅंडो स्पर्धेत तिने रौप्य पदक पटकावले. तिने आजवर 4 राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवून सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. तसेच तिने यापूर्वी महाराष्ट्र राज्य तायक्वाँडो स्पर्धेमध्ये व खेलो इंडिया स्पर्धा निवड चाचणीमध्ये सुवर्ण पदक पटकावून रोटरी स्कूलचे नाव गौरविले होते.
यामुळे तिची खेलो इंडिया मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स् अॅण्ड स्पोर्टस् भारत सरकार यांच्या मान्यतेने व पाॅडेचेरी तायक्वाॅंडो स्पोर्टर्स असोसिएशन आयोजित पहिली अस्मिता खेला इंडिया महिला लिग फेज 3 स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. भविष्यामध्ये आशियाई युथ गेम्स् मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचा मानस उरी बाळगुण त्याकडे तिची यशस्वी वाटचाल सुरू आहे. तिच्या या यशामुळे सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कु. विधी गोरे हिची राष्ट्रीय खेलो इंडिया तायक्वाँडो स्पर्धेकरिता निवड झाली असून सुवर्णपदकाला गवसणी घालण्याची तयारी विधी करत आहे. कु. विधीला क्रीडाशिक्षक व तालुका तायक्वाॅंडो प्रशिक्षक कृणाल चव्हाणयांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु. विधी गोरे हिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.