श्रीवर्धन तालुक्यातील खुजारे ग्रामपंचायत हद्दीमध्ये स्थानिकांचा विरोध झुगारून सुरू असलेल्या बॉक्साईट उत्खननाला गेले महिनाभर ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी व विविध संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. निसर्गसुंदर कोकणच्या पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या व जैवविविधतेवर परिणाम करणाऱ्या या उत्खननाला जवळच्या वांजळे ग्रामपंचायतीनेसुद्धा विरोध दर्शवला आहे.
वांजळे येथे असलेल्या तालुक्यातल्या एकमेव ऐतिहासिक मदगड किल्ल्याची तटबंदी बॉक्साइटच्या सुरुंग स्फोटामुळे ढासळत असल्याचं सरपंच आत्माराम गायकर यांनी सांगितल आहे. त्याबरोबरच गावामध्ये असणाऱ्या पाण्याच्या स्त्रोतावर या मायनिंगमुळे परिणाम झाले आहेत झाले आहेत. बॉक्साइटच्या उत्खननामुळे आंबा,काजू व इतर फळझाडांवर पसरणाऱ्या धुळीमुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून वांजळे गावचे सरपंच आत्माराम गायकर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीनं खुजारे येथील बॉक्साईट उत्खनन बंद करण्यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना लेखी निवेदन देऊन सकारात्मक निर्णय घेण्यासंदर्भात विनंती केली.
चारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची पर्यावरणविषयक असलेली तळमळ काही मुठभर धनदाडग्यांच्या हव्यासापोटी आज मदगड किल्ल्याच्या जिव्हारी लागत असेल तर आपण छत्रपतींचा वारसा चालवण्यास खरंच समर्थ आहोत का? याबाबत प्रत्येकाने अंतर्मुख होणं गरजेचं आहे.अशा भावना शिवमप्रेमींकडून व्यक्त होत आहेत. एकीकडे या निसर्ग सुंदर श्रीवर्धन तालुक्याला पर्यटनाच्या जागतिक नकाशावर पोहचवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत. परंतु तालुक्यामध्ये विविध ठिकाणी बॉक्साइट उत्खननामुळे आपल्याला लाभलेल्या या समृद्ध नैसर्गिक संपत्तीचं रक्षण करण्याऐवजी निसर्गावरच घाला घालण्याचं काम होत असेल तर याचा पर्यटन व्यवसायावरसुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो याचा गांभीर्याने विचार होणं आवश्यक आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.