
सोगाव ( अब्दुल सोगावकर ) :
अध्यात्मिक आवड असेल तर सवड नक्कीच मिळते, याची प्रचिती खासदार सुनिल तटकरे यांच्या सुतारवाडी येथील घरी गणेश चतुर्थी निमित्त गेल्यावर भजन गायक रुपेशबुवा देशमुख व त्यांचे सहकारी तसेच किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व त्यांचे सहकारी यांना पाहायला मिळाले.
रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी गणेश चतुर्थी निमित्ताने सोमवार दि. ९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री नऊच्या सुमारास खालापूर तालुक्यातील डोणवत येथील रायगड भूषण पुरस्कार प्राप्त रुपेशबुवा देशमुख यांचे सुश्राव्य भजन संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, यावेळी खासदार तटकरे कुटुंबातील सर्व सदस्य आपल्या व्यस्त दिनचर्येतुन वेळात वेळ काढून भजन संगीताच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात पूर्ण तटकरे कुटुंब रुपेशबुवा यांच्या सुश्राव्य भजन संगीतांमध्ये तल्लीन होऊन मंत्रमुग्ध झाले होते. यासमयी भजनसम्राट रुपेशबुवा देशमुख व त्यांचे सहकारी यांचे खासदार सुनिल तटकरे, वरदा सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांनी प्रत्येक भजन संगीत अप्रतिम गायन केल्याबद्दल विशेष कौतुक केले. तसेच रुपेशबुवा देशमुख व त्यांचे सहकारी यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मानित केले.
या कार्यक्रमाला अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड, शिक्षक अजित हरवडे, विजय मोरे, रोशन नाईक उपस्थित होते. याचवेळी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक अजित हरवडे यांचा खासदार सुनिल तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांनी जाहीर सत्कार केला.