पोलादपूर तालुक्यातील शिमगोत्सवाला उधाण आले असताना दुचाकीवरील दोन तरूणांना ओंबळीमार्गे खेडला जाणाऱ्या खासगी लक्झरी बसची धडक बसून दोघांचा मृत्यू झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्तादुरूस्ती कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. दरम्यान, ओंबळी ग्रामस्थांमध्ये या दु:खाच्या सावटामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ओंबळीमार्गे खेडला जाणाऱ्या खासगी बसची (क्रमांक एमएच 04 एलवाय 9199) धडक बसल्याने दुचाकीस्वार आणि त्याच्या मागील सीटवर बसलेल्या तरूणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली. यावेळी पोलादपूर पोलीसांनी पोलीस निरिक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी धाव घेतल्यानंतर दोन्ही तरूणांना अत्यवस्थ जखमी अवस्थेत पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये हलविण्यात आले असता तेथे दोघांना मृत घोषित करण्यात आले.
यावेळी मृतांची नांवे राहुल श्रीरंग साळुंखे (वय 27) व सिध्देश गणेश सकपाळ (वय 23) अशी असल्याची माहिती पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामधून प्राप्त झाली. रात्री ओंबळी येथे उशिरापर्यंत शिमग्याचे कार्यक्रम सुरू असताना पहाटेपर्यंत गांव जागे होते. यामुळे मंदिरामध्ये प्रकाशव्यवस्था सुरूच राहिल्याने हे दोघे सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ओंबळी गावातून मंदिराच्या लाईट बंद करण्यासाठी युनिकॉर्न मोटारसायकलवरून (एमएच04 केएन 8221) जात असताना तीव्र वळणावर त्यांच्या दुचाकीची समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या सुजाता या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसची ठोकर बसल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर ओंबळी गांवातील शिमगोत्सव तातडीने रद्द करण्यात आला असून सर्वत्र शोकाकूल वातावरण पसरले आहे. दुपारी पोलादपूर ग्रामीण रूग्णालयातून शवविच्छेदनानंतर संबंधितांच्या ताब्यात तरूणांची प्रेतं देण्यात आल्यानंतर ओंबळी गावी रवाना होऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलादपूर पोलीस ठाण्यात या अपघातप्रकरणी लक्झरी बस चालक प्रेमचंद महात्ता चौधरी (वय 50 वर्षे, ऐरोली नवी मुंबई) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरिक्षक महाडीक हे अधिक तपास करीत आहेत. या अपघाताची फिर्याद रोहित रमेश चिकणे यांनी दिली आहे.
याप अपघातप्रकरणी पोलादपूर पोलीसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 17-2025 नुसार नोंद केली असून सामाजिक कार्यकर्त्यांकडून अरूंद रस्ता आणि साईडपट्टीवरील भराव यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रमाणे प्रश्नचिन्ह उठविण्यात आले त्याचप्रकारे पुन्हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. याच सामाजिक कार्यकर्त्यांनी तरूणवर्गाला रात्रीच्या जागरणानंतर मोटारसायकलीवरून तडकाफडकी प्रवास करू नये, असेही आवाहन केले आहे.
दरम्यान, पोलादपूर ते खेड दरम्यान कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग सुरू झाले असतानादेखील ओंबळीमार्गे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल कंपनीच्या बसने या अरूंद रस्त्यावरून खेडकडे जाण्याचा मार्ग का निवडला याबाबतदेखील साशंकता व्यक्त होत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.