अलिबाग (अमुलकुमार जैन) :
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील प्रसिद्ध असलेले प्रसूतीतज्ञ डॉ. अनिल फुटाणे यांच्या खासगी रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर प्रसूती झालेल्या महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. मृत महिलेचे नाव सुचिता थळे असे असून ती अलिबाग तालुक्यातील रहिवाशी आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुचिता थळे हिची प्रसूती सुलभ व्हावे यासाठी तिच्या कुटुंबियांनी तिला अलिबाग सहित जिल्ह्यात प्रसूती साठी प्रसिद्ध असलेले डॉ. अनिल फुटाणे यांच्या अलिबाग रेवस बाह्यवळण येथील रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या डॉ . फुटाणे हॉस्पिटल अॅण्ड मॅटर्निटी होम या खासगी रुग्णालयात दाखल केले होते.
सदर महिलेस 14 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दाखल केले होते. तिचे सोनोग्राफी अहवाल पाहिल्यानंतर हिची प्रसूती ही सिझर द्वारे दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी दुपारी तीनच्या सुमारास झाली होती. प्रसूती झाली त्यावेळी सुचिता थळे आणि नवजात अर्भक यांची प्रकृती स्थिर होती. मात्र रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तिची प्रकृती बिघडली असता तिला प्राथमिक उपचार केल्यानंतर तिची प्रकृती स्थिर झाली असल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला होता.
मात्र आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सुचिता थळे या महिलेची प्रकृती परत बिघडल्याने तिला तातडीने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र जिल्हा रुग्णालयात औषध उपचार दरम्यान सकाळी दहा वाजता तिचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईक यांना समजली. सदर महिलेचा मृत्यू झाला असल्याने तिचे नातेवाईक सहित महिलेच्या गावातील ग्रामस्थ संतप्त होऊन जिल्हा रुग्णालयात गदारोळ घालू लागले.
सदर घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
———————————-