क्षत्रिय मराठा पतसंस्थेमार्फत पोलादपूर तालुक्यातील सर्वसामान्यांना तात्काळ अर्थसहाय्य करण्यात येईल. मोठया रक्कमेच्या कर्जासाठी मात्र निकषांचा आधार घेतला जाईल; कारण मोठी कर्ज घेणारेच बुडवतात सर्वसामान्यांना कर्ज फेडण्याची घाई असते, असे प्रतिपादन उदघाटन सोहळयाच्या अध्यक्षस्थानावरून भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी केले. क्षत्रिय मराठा पतसंस्थेला भविष्यात जे काही सहकार्य लागेल ते करणार असल्याची ना. गोगावले यांनी उदघाटनपर भाषणामध्ये ग्वाही दिली.
याप्रसंगी क्षत्रिय मराठा पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश येरुणकर, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, भाजपा रायगड सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, शिवाई शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. विनोद देशमुख, समाजसेवक सुभाष पवार, रायगड सहकारी बँकेचे संचालक प्रसन्ना पालांडे, मुंबई बँकेचे सरव्यवस्थापक संदीप सुर्वे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, कृउबा संचालक लक्ष्मण मोरे, भाजपाध्यक्ष तुकाराम केसरकर, मनसे उपाध्यक्ष राज पार्टे, संदीप केदार, महाड अध्यक्ष जयवंत दळवी, महाड तालुकाप्रमुख विजय सावंत, राजेश सुर्वे गुरूजी, पोलादपूर नगराध्यक्षा सोनाली गायकवाड व नगरसेविका, क्षत्रिय मराठा पतसंस्थेचे उपाध्यक्ष अंकुश मोरे यांसह मोठया संख्येने सहकारातील कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष पवार यांनी, पोलादपूरच्या विकासासाठी केवळ धरणे, रस्ते, सभागृह न बांधता तालुक्यातील तरूण तरूणींना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी ना.भरत गोगावले यांनी महाडमध्ये रोजगाराची संधी महिलांना देण्याची घोषणा केली आहे.त्याचधर्तीवर येथील तरूणांना रोजगार व नोकरीच्या संधी मिळण्याची गरज असल्याचे सांगितले.
हिरवळ प्रतिष्ठानचे किशोरभाई धारिया यांनी, एक मुख्यमंत्री ना.फडणवीसांसोबत तर दुसरे उपमुख्यमंत्री ना.शिंदे यांचे निकटवर्ती असल्याने केवळ क्षत्रिय मराठा पतसंस्थेद्वारेच नव्हे तर महाड पोलादपूरच्या तरूणांना माता भगिनींना रोजगाराची संधी देण्याची व खऱ्या अर्थाने व्यक्तीगत विकासाची सुरूवात करून देण्याची ताकद दोन्ही नेत्यांकडे असल्याने आता केवळ विकासच नाही तर प्रत्येकाला पुढे आणण्याचे प्रयत्न होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळीरोजगार व हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी उदघाटनपर भाषणात, कोतवालसारख्या दुर्गम भागातील आपले सुपुत्र आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना विधानपरिषदेत तडफेने आणि मुद्देसूद भाषण करताना पाहिले आहे. क्षत्रिय मराठा ही पतसंस्था वर्ष-दोन वर्षात उंचीवर गेलेली दिसेल. आ.दरेकर यांनी हिम्मत दाखवून आपल्या मातीतील लोकांसाठी ही पतसंस्था आणली आहे. पुढील दहा वर्षानंतर या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. दोघेही यासाठी जे काही सहकार्य लागेल ते निश्चित करू, अशी ग्वाही दिली. देशावर कर्जबाजारीपणामुळे जशा आत्महत्या होतात तशा कोकणात होत नाही. अडचणीवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना आहेत. येथे मुलांना खेळण्यासाठी खेळाचे मैदान, आयुर्वेदिक महाविद्यालय उपलब्ध करून देणार आहोत. जेजे काही चांगले करायचे आहे ते नक्कीच करणार, फक्त तुमची साथ आवश्यक आहे. असे ना.गोगावले म्हणाले.
भाजप गटनेते व मुंबै बँकेचे अध्यक्ष आ. दरेकरयांनी अध्यक्षीय भाषणामध्ये पुढे, क्षत्रिय मराठा को-ऑप. पतसंस्था स्वातंत्र्यापूर्वीची आहे. कोकणातून आलेल्या लोकांनी मुंबईत ही पतसंस्था सुरू केली. 25 वर्षांपूर्वी ज्या पतसंस्था स्थापन झाल्या त्यांनी 25 हजार कोटींचा टप्पा पार केला. परंतु ही पतसंस्था एकही शाखा काढू शकली नाही. राजेश येरूणकरांनी अध्यक्षपद घेतल्यानंतर मी त्यांच्याकडून बॅलन्सशीट मागितली असता पतसंस्थेचे कामकाज सुधारण्याची आवश्यकता दिसून आल्याने त्यांना सहकार्य करण्याचे ठरविले. गेल्या सहा महिन्यात या पतसंस्थेच्या तिसऱ्या शाखेचे उदघाटन होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लोकं मुंबईत एकत्रित येऊन पतसंस्था हजारो कोटींवर नेत असतील तर कोकणातील जनतेला हे का जमत नाही?या इच्छाशक्तीपोटी हा विचार पूर्णत्वास नेला आहे.
आ.दरेकर यांनी पुढे भाषणात मंत्री भरत गोगावले यांच्याकडे फलोत्पादन खाते आहे. कोकण रेल्वेचे जे थांबे आहेत तेथे भाजीपाला, फळांचे स्टॉल उभे केले तर चाकरमानी ते खरेदी करू शकतील व या स्टॉलच्या माध्यमातून येथील बेरोजगार तरुणांना रोजगारही मिळेल, त्यादृष्टीनेही प्रयत्न व्हायला पाहिजेत,अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पोलादपूर तालुक्यातील हजारो गोरगरीब जनता व कार्यकर्ते तसेच भाजप, शिवसेना व उबाठा सेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
——————————————–
ना.गोगावले यांनी मतमोजणीच्या दिवशी शुभेच्छा देणाऱ्या ताई आज व्यासपिठावर आहेत याचा आनंद असून त्यांना तुम्ही घेतले काय किंवा त्या आमच्याकडे आल्या काय. एकच महायुती आहे. त्यांना कोणाकडे जायचे आहे त्यांनी ठरवावे, असा नर्मविनोदी शैलीत हळूवार चिमटा काढत महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या संभाव्य पक्षांतराबाबत मिष्कील भाष्य केले.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.