कोण होणार पोलादपूरच्या नगराध्यक्षा?

Poladpur Nagaradhakshya Umedvar
पोलादपूर (शैलेश पालकर) :
नगरपंचायत पोलादपूरच्या नगराध्यक्षा सोनाली गायकवाड अखेर पायउतार झाल्या असून आज शुक्रवार, दि. 4 एप्रिल 2025 रोजी रिक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी अस्मिता पवार, शिल्पा दरेकर आणि स्नेहल मेहता या तीन नगरसेविकांमध्ये चुरस असल्याचे दिसून येत आहे. मात्र, काँग्रेस पक्षातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आणि तिथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात म्हणजेच महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये गेलेल्या नगरपंचायतीमधील विरोधी गटाला महायुतीचा धर्म म्हणून सत्ताधारी शिवसेना पक्षाकडून काय मिळणार, याबाबत उत्कंठा निर्माण झाली आहे.
नगरपंचायत पोलादपूरमध्ये दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या सोनाली गायकवाड, अस्मिता पवार, स्नेहल मेहता, शिल्पा दरेकर तर काँग्रेसकडून निवडून आलेल्या श्रावणी शहा, आशा गायकवाड, तेजश्री गरूड आणि भाजपकडून अंकिता निकम जांभळेकर या नगरसेविका निवडून आल्या. यावेळी महिला सर्वसाधारण नगराध्यक्षपद आरक्षित असल्याने शिवसेनेने सोनाली गायकवाड यांना संधी दिली. मात्र, शिवसेनेच्या पक्षांतर्गत निर्णयानुसार त्यांचा राजिनामा घेण्यात आला आहे.
शिवसेना भाजप महायुतीनुसार भाजपच्या नगरसेविका अंकिता जांभळेकर यांना सभापती पद देणे सत्ताधारी शिवसेनेला भाग पडले तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडे जायचे की भाजपमध्ये या संभ्रमात असलेल्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर प्रभाग तीनमधून भाजपच्या उमेदवार विशाखा आंबेतकर यांच्याविरूध्द निकाराची लढत देऊन निवडून आलेल्या नगरसेवक निखील कापडेकर यांनी शिवसेना प्रवेश न करताच सत्ताधारी शिवसेनेच्या गोटातून सूचक अनुमोदक घेऊन सभापती पद पटकावले. यावेळी विरोधी गट पक्षांतराच्या प्रयत्नात असल्याने निखिल कापडेकर यांच्याविरोधात पक्षांतरबंदी अथवा पक्षविरोधी कारवाई करण्याची मानसिकता विरोधी गटामध्ये दिसून आली नाही. परिणामी, सभापती पदाच्या निवडीवेळी उपनगराध्यक्ष पद रिक्त राहिले होते आणि निखिल कापडेकर यांना सभापती पदावर संधी मिळाली.
यानंतर प्रसाद इंगवले यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. नगराध्यक्षपद रिक्त झाल्याने सध्या प्रसाद इंगवले प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. याचदरम्यान नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहिर झाल्याने गेल्या चार दिवसांपासून इच्छुक नगराध्यक्षांची सेटींग जोरदार सुरू झाली. मात्र, शिवसेना संघटनेचा निर्णय अंतिम असेल अशी भूमिका जाहिर झाल्याने गुरूवारी सायंकाळी नाव निश्चितीसाठी बैठक घेण्याचे ठरले. मंत्री ना.भरत गोगावले यांच्याकडून संभाव्य नगराध्यक्षपदावर शिक्कामोर्तब या बैठकीमध्ये केले जाणार आहे.
यामध्ये उमेदवारी मिळण्यासाठी महाडमधून जोरदार सेटींग झालेल्या शिल्पा देवेंद्र दरेकर यांच्यासाठी पुन्हा महाडमधून वजन वापरले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे तर माजी उपनगराध्यक्ष स्व.उमेश पवार यांच्या पत्नी व सक्रीय नगरसेविका अस्मिता पवार या सक्षमपणे कामकाज करू शकणार असूनही त्यांच्यासाठी शब्द टाकण्यासाठी उमेश पवार हयात नसल्याची उणीव त्यांना भासत आहे. याचसोबत प्रेस क्लबचे पोलादपूर अध्यक्ष सचिन मेहता यांनीही  त्यांच्या नगरसेविका पत्नी स्नेहल मेहता यांच्यासाठी पक्षसंघटनेकडे प्रयत्न सुरू केले आहेत.
याचदरम्यान, स्विकृत नगरसेवक आणि शहरप्रमुख सुरेश पवार यांना स्विकृत नगरसेवक पदाचा राजिनामा दिल्याने त्यांच्यावर कोणती जबाबदारी येणार आणि त्यांच्या राजिनाम्याने रिक्त झालेल्या स्विकृत नगरसेवक पदावर कोणाला संधी मिळणार, याबाबतही चर्चा सुरू झाली असल्याने नगराध्यक्षा कोण हे आधीच ठरल्याने सुरेश पवार यांना राजिनामा दिल्यानंतर भावी नगराध्यक्षांना सहकार्य करण्याची भूमिका घेण्यास सांगितले जाऊ शकते, असेही शिवसेनेच्या गोटातून सांगितले जात आहे. मात्र, विरोधी गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात समावेश झाल्यानंतर महायुतीचे शिवसेना भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगरपंचायतीमध्ये आल्याने विरोधी पक्षाचे अस्तित्व संपुष्टात येऊन विरोधी गटालाही सत्तेची पदं भोगायला मिळणार काय, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading