महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज किल्ले रायगड येथे भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले आणि जनतेला संबोधित करत शिवचरित्र देशभर पोहोचवण्याचे आवाहन केले.
या दौऱ्यात शाहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारसह अनेक मंत्री देखील उपस्थित होते.
अमित शाह म्हणाले, “मी शिवचरित्र वाचलंय. बालपणात जिजाऊंनी दिलेल्या प्रेरणेमुळेच शिवाजी महाराज छत्रपती झाले. स्वधर्म आणि स्वभाषेसाठी प्राण पणाला लावणारे अपराजित सैन्य या भूमीला लाभलं.”
त्यांनी पुढे सांगितले, “चारही बाजूंनी आदिलशाही आणि मुघलशाहीने वेढलेला महाराष्ट्र छत्रपतींच्या प्रेरणेने हिंदवी स्वराज्यात रूपांतरित झाला. अटकपासून कटकपर्यंत साम्राज्य विस्तारलं. एका १२ वर्षांच्या मुलाने भगवा पसरवण्याची शपथ घेतली आणि संपूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र दिला.”
शिवरायांच्या दूरदृष्टीचा उल्लेख करत शाह म्हणाले, “स्वातंत्र्याला १०० वर्षं पूर्ण झाल्यावर भारत हा एक विकसित राष्ट्र असेल, अशी कल्पना शिवाजी महाराजांनी केली होती.”
तसेच ते म्हणाले, “मी इथे भाषण देण्यासाठी आलो नाही, तर शिवरायांकडून प्रेरणा घेण्यासाठी आलो आहे. शिवचरित्र फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न ठेवता ते देशभर पोहोचायला हवं.”
दुसरीकडे, राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, रात्री १२.३० वाजता एकनाथ शिंदे रिट्झ हॉटेलवर पोहोचले. त्यामुळे रात्री अमित शाह आणि शिंदे यांची बैठक झाली नाही. सकाळीही यांच्यात औपचारिक बैठक झाली नाही, कारण शाह यांच्याशी भाजपचे स्थानिक नेते भेटत होते.
अजित पवार थेट एअरपोर्टवरच स्वागतासाठी आले, मात्र ते हॉटेलवर पोहोचले नाहीत. सकाळी १०:१० वाजता अमित शाह, फडणवीस आणि शिंदे हे एकाच वाहनात पुणे विमानतळाकडे रवाना झाले आणि तेथून एकाच विमानाने रायगडकडे प्रस्थान केलं.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.