
माथेरान (मुकुंद रांजणे) :
अजेय संस्था, ठाणे यांच्यावतीने दृकश्राव्य माध्यमातून मराठी राज्यभाषा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी ‘दशपदी’ या खास काव्य जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी अजेय संस्थे मार्फत लेखक, दिग्दर्शक तथा नाटककार, डॉ. क्षितिज कुलकर्णी आणि प्रसन्न शांताराम माळी अभिनेता व काव्यवाचक यांच्या सादरीकरणातून विद्यार्थी आणि उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले.
कवी कुसुमाग्रज यांच्या कणा या कवितेचे सुरुवातीला चित्ररूपात सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर काव्यभाष्य झाले. गणपत वाणी सांगाती यासारख्या कविता सादर करून विद्यार्थ्यांना त्याचे अर्थ उलगडून सांगण्यात आले.
यावेळी शाळेचे विद्यार्थिनी जारा नईम शेख, आणि शिक्षक कवी संघपाल वाठोरे यांच्या कवितांचे सादरीकरण झाले.
कार्यक्रमाचे आयोजन अजेय संस्थेच्या सदस्या आणि माथेरान नगर परिषदेच्या माजी नगरसेविका विदुला मनोज खेडकर यांच्या सहकार्यातून करण्यात आले होते.
यावेळी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती विदुला गोसावी यांनी हा कार्यक्रम पुन्हा मोठ्या स्वरूपात शाळेत राबविण्यात यावा यासाठी विनंती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संघपाल वाठोरे यांनी केले.
—————————————————-
दशपदी या सदराखाली अजेय संस्था यांनी सादर केलेला अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. कवितेचे दृकश्राव्य स्वरूपात अगदी सोप्या शब्दात सादरीकरण केल्याने कविता अगदी सहज समजतात. कविते मागील इतिहास आणि माहीत नसलेल्या गोष्टी सुद्धा डॉ. क्षितिज कुलकर्णी आणि प्रसन्न माळी यांच्या संवादातून स्पष्ट होतात. अतिशय छान कार्यक्रम आहे.
…विदुला खेडकर, उद्योजिका माथेरान